Untimely Rain Maharashtra : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट येणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडला होता.
या दोन्ही विभागातील दक्षिण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली होती. त्यावेळी हलका ते मध्यम पाऊस झाला असल्याने कोकणातील भात पिकाला या अवकाळीचा फटका बसला होता.
पावसाने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तथापि त्यावेळी बरसलेला हा पाऊस आगामी रब्बी हंगामासाठी पोषक होता. पावसाळी काळात कमी पाऊस बरसला असल्याने रब्बी हंगामात या पावसाचा उपयोग होणार होता.
ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे अशा ठिकाणी अवकाळी पावसाचा निश्चितच फायदा झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात उद्यापासून अर्थातच 23 नोव्हेंबर 2023 पासून वातावरणात मोठा बदल होईल आणि 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
या कालावधीत काही भागात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडणार असा अंदाज आहे.
एकंदरीत काही भागात वादळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अधिक सावध आणि सतर्क राहणे आवश्यक आहे.
IMD नुसार, उद्या आणि परवा अर्थातच 23 आणि 24 नोव्हेंबरला आधी ज्या भागात अवकाळी पाऊस बरसला होता त्या भागात म्हणजे कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सुद्धा पावसाची शक्यता आहे.
तसेच 25 आणि 26 नोव्हेंबरला कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे.
तसेच या कालावधीत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आली आहे.