Tur Rate : तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुन्हा एकदा तुरीचे बाजार भाव वाढले आहेत. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील या मुख्य पिकातून त्यांना चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा आहे.
दोन दिवसांपूर्वी तुरीचे बाजार भाव कमी झाले होते. बाजारभाव 10 हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा खाली आले होते. यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आलेत. शेतकऱ्यांना पुन्हा तुरीचे भाव कमी होतील असे वाटत होते.
खरेतर अचानक बाजारात तुरीची आवक वाढली आणि यामुळे बाजारभाव दबावात आले होते. मात्र आवकेचा दबाव बाजारभावावर येताच शेतकऱ्यांनी एक मोठा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांनी तुरीची आवक कमी केली. यावर्षी तुरीला विक्रमी दर मिळणार हे शेतकऱ्यांना ठाऊक आहे. यामुळे त्यांनी तुरीची विक्री थांबवली आणि परिणामी आता पुन्हा एकदा तुरीचे बाजारभाव वाढू लागले आहेत.
तुरीचे बाजारभाव पुन्हा एकदा अकरा हजाराच्या घरात पोहोचले आहेत. विशेष म्हणजे काही तज्ञांनी पुढील महिन्यात तुरीचे बाजार भाव 11,000 चा टप्पा पार करतील आणि 12 हजाराच्या घरात पोहोचतील अशी आशा व्यक्त केली आहे.
यामुळे आता तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार खरंच तुरीचे बाजार भाव 12 हजारापर्यंत जातात का हे पाहण्यासारखे राहणार आहे.
काल अर्थातच 27 जानेवारी 2024 ला झालेल्या लिलावात राज्यातील बहुतांशी बाजारात तुरीचे बाजार भाव दहा हजार रुपये प्लस पाहायला मिळालेत.
विशेष म्हणजे अकोला आणि जालना या बाजार समितीमध्ये तुरीला सर्वाधिक दर मिळाला आहे. या दोन्ही बाजारात तुरीला दहा हजार 550 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जालना बाजार समितीत काल पांढऱ्या तुरीची 1704 क्विंटल आवक झाली. काल, कमाल 10,550, किमान 7,711 आणि सरासरी 9,800 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
तसेच काल अकोला बाजार समितीत लाल तुरीची 2,205 क्विंटल आवक झाली आहे. कमाल 10,550, किमान 8,605 तर सरासरी 9,750 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.