Tur Rate : तूर हे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. याची लागवड विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये केली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तुरीच्या बाजार भावात सातत्याने घसरण होत असून यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत. मंडळी सहा महिन्यांपूर्वी म्हणजे साधारणतः जून महिन्यात तुरीला तब्बल साडेबारा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत होता.
जून 2024 मध्ये जी तुर बारा हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल या भावात विकली जात होती तीच तूर आजच्या घडीला 7000 रुपये प्रति क्विंटल दराने शेतकऱ्यांना नाईलाजाने विकावी लागत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. विशेष बाब अशी की गेल्या दोन महिन्यांमध्ये तुरीचे दर अडीच हजार आणि कमी झाले आहेत.
म्हणजेच पहिल्या चार महिन्यात अडीच हजाराने भाव कमी झालेत आणि त्यानंतरच्या दोन महिन्यात हे बाजार भाव आणखी अडीच हजारांनी कमी झालेत. यामुळे आगामी काळात तुरीची आवक आणखी वाढून बाजार भाव आणखी पडू शकतात अशी भीती देखील शेतकऱ्यांना वाटत आहे आणि यामुळे सध्या शेतकरी पॅनिक मोडवर आले आहेत.
म्हणून शेतकऱ्यांच्या माध्यमातून पॅनिक सेलिंग सुरू असून याचा फायदा व्यापारी वर्ग उचलत आहे. पण यात शेतकऱ्यांचीही चूक नाही आगामी काळात दर वाढतील की नाही याची शेतकऱ्यांना कोणतीच गॅरंटी नाही. मात्र या साऱ्या घडामोडींचा फायदा व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात मिळतोयं यात शंकाच नाही.
दरम्यान याच साऱ्या पार्श्वभूमीवर आता तूर उत्पादकांच्या माध्यमातून शासनाने लवकरात लवकर तूर खरेदी केंद्र सुरू करावी अशी मागणी उपस्थित करण्यात आली आहे. यामुळे शासनाचे तूर खरेदी केंद्र कधी सुरू होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. केंद्राने ५ राज्यांमध्ये ९ लाख ६६ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट जाहीर केले.
पण महाराष्ट्रात अद्यापही खरेदीचे उद्दीष्ट जाहीर झाले नाही, ही गोष्ट खूपच शॉकिंग आहे. इतर राज्यांमध्ये जर खरेदीचे उद्दिष्ट जाहीर असेल तर महाराष्ट्रात सुद्धा खरेदीचे उद्दिष्ट जाहीर करून लवकरात लवकर खरेदी सुरू करणे अपेक्षित आहे. देशात तुरीच्या भावात जून २०२३ पासून तेजीला सुरुवात झाली.
त्याचे कारण होते कमी पाऊस आणि कमी लागवड. तेव्हापासून सुरु झालेल्या तेजीने मजल दरमजल करत पुढील बारा महिन्यात एक नवा विक्रम प्रस्थापित केला. जून २०२४ मध्ये तुरीचे बाजार भाव कधी नव्हे ते १२ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल या नव्या विक्रमी भाव पातळीवर पोहोचलेत.
कारण गेल्या हंगामात तुरीची लागवड कमी होऊन उत्पादनात मोठी घट झाली होती. पण 2024 मध्ये माॅन्सून चांगला बरसला. लागवडही १४ टक्क्यांनी वाढली. त्यामुळे चांगल्या उत्पादनाची चर्चा सुरु आहे. तुरीचे उत्पादन वाढणार ही शक्यता लक्षात घेऊन बाजारात नवीन माल येण्याच्या आधीपासूनच नरमाई पाहायला मिळाली.
जून महिन्यातील मोठ्या तेजीनंतर बाजारात भाव हळूहळू कमी होत गेले. नोव्हेंबर मध्ये तुरीचे कमाल दर दहा हजार रुपये होते. डिसेंबर उजाडेपर्यंत तुरीचा बाजार भाव हा जवळपास आठ हजाराच्या खाली आला होता. त्यानंतर बाजार भाव आणखी सातत्याने कमी होत गेला. देशातील काही बाजारात नवी तूर दाखल झाल्यानंतर दर आणखी कमी झाले.
सध्या बाजार समित्यांमध्ये तुरीला ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. म्हणजेच जून महिन्यातील उच्चांकी भावाचा विचार करता सध्याचा भाव हा ५ हजाराने कमी आहे. तर नोव्हेंबरमधील भावाचा विचार केला तर सध्या २ हजार ५०० रुपये कमी भाव आहे. महत्त्वाचे म्हणजे अजूनही बाजारात नवीन तुरीची फारशी आवक पाहायला मिळत नाही.
जेव्हा नवीन तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल तेव्हा हे दर आणखी कमी होतील. फेब्रुवारीत तुरीची आवक वाढण्याची शक्यता आहे. म्हणून आगामी काळात दर कसे राहतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र दरात होणारी ही पडझड थांबवण्यासाठी सरकारने लवकरात लवकर हमीभावाने खरेदी सुरू करणे आवश्यक आहे, असे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केलय.