Tur Rate Maharashtra : तूर हे राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. खरीप हंगामात उत्पादित होणाऱ्या या पिकाच्या नवीन मालाची आवक गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली आहे. पण नवीन माल बाजारात येत नाही तोवर तुरीचा दर घसरला, राज्यातील अनेक बाजारांमध्ये तुरीचे दर घसरले आहेत. साधारणता एका महिन्यापूर्वी म्हणजेच डिसेंबर 2024 च्या सुरुवातीच्या आठवड्यात विदर्भ विभागातील अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे बाजार भाव हे दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते.
मात्र नंतर हळूहळू बाजारभावात घसरण होत गेली आणि सध्या या बाजारात कमाल दर हे साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहेत. मंडळी यंदाच्या खरीप हंगामातील तुरीची काढणी सुरू झाली आहे. तुरीचे उत्पादन तुलनेने कमीच आहे. काही ठिकाणी एकरी तीन क्विंटलपासून पाच क्विंटलपर्यंत उतारा येत आहे. त्यातही ‘मुकण’चे प्रमाण अधिक आहे. ही तूर बाजारात विक्रीला येऊ लागताच दर घसरण वाढली अन राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
जेव्हा तुरीची आवक वाढेल तेव्हा बाजारभावाचे काय होणार याचा विचार करूनच तुर उत्पादकांच्या छातीत धडकी भरली आहे. गेल्या एका महिन्याभरापासून तुरीच्या बाजारभावात घसरण होत आहे आणि ही घसरण अजूनही कायमच आहे, म्हणून आता आपण आगामी काळात जेव्हा तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढेल तेव्हा बाजार भाव आणखी कमी होणार का? बाजारभाव कमी होऊ नयेत यासाठी सरकारकडून काय उपाययोजना होणे आवश्यक आहे? याबाबतचा आढावा या लेखातून घेणार आहोत.
शेतकरी मित्रांनो, तुरीचा भाव मागील ६ महिन्यांत ५ हजाराने आणि एकाच महिन्यात २ हजार ५०० रुपयाने कमी झाला. आवकेचा दबाव वाढून दर आणखी कमी होण्याची भीती आहे. मंडळी, देशात जून २०२३ पासून म्हणजेच साधारणता दीड वर्षांपूर्वी तुरीचे बाजारभाव तेजीत आलेत, त्याचे कारण होते कमी पाऊस आणि कमी लागवड क्षेत्रामुळे झालेले कमी उत्पादन.
तेव्हापासून सुरु झालेल्या तेजीने मजल दरमजल करत गेल्या वर्षीच्या म्हणजे 2024 च्या जून महिन्यात १२ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठला. कारण गेल्या हंगामात तुरीची लागवड कमी होऊन उत्पादनात मोठी घट झाली होती. पण यंदा माॅन्सून चांगला बरसला, लागवडही १४ टक्क्यांनी वाढली म्हणून चांगल्या उत्पादनाची चर्चा सुरु झाली. देशात यंदा तुरीचे उत्पादन वाढण्याची शक्यता असल्याने नवा माल बाजारात दाखल होण्याच्या आधीच बाजारात नरमाई यायला सुरुवात झाली.
जून महिन्यातील मोठ्या तेजीनंतर बाजारात भाव कमी होत गेले. नोव्हेंबर मध्ये तुरीला दहा हजार रुपये प्रति क्विंटल असा कमाल दर मिळाला. पण डिसेंबर 2024 महिन्यात देशातील काही बाजारात नवी तूर दाखल झाल्यानंतर दर आणखी कमी झालेत. सध्या काही बाजार समित्यांमध्ये तुरीला ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. म्हणजेच जून महिन्यातील उच्चांकी भावाचा विचार करता सध्याचा भाव ५ हजाराने कमी आहे.
तर नोव्हेंबरमधील भावाचा विचार केला तर सध्या २ हजार ५०० रुपये कमी भाव आहे. महत्त्वाचे म्हणजे तुरीचा हा भाव हमीभावापेक्षा कमी आहे, म्हणूनच पिकासाठी आलेला खर्च कसा भरून काढावा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे उभा आहे. विदर्भातील अकोला एपीएमसीमध्ये आजही कमाल बाजार भाव साडेआठ हजार रुपयांच्या आसपास आहे. पण येथे सरासरी बाजार भाव फारच कमी झाला आहे. दुसरीकडे बाजारात आवक सतत वाढत आहे.
दक्षिणेत तुरीचे पीक चांगले असून तेथील प्रचंड आवकेमुळे बाजारात तुरीची उपलब्धता वाढली आहे. याचा स्थानिक बाजारातील दरांवरही परिणाम झाला, असे व्यापारी सूत्राने सांगितले. सोबतच तुरीमध्ये आर्द्रता सुद्धा आहे अन त्यामुळेचं दर कमी मिळत असल्याचा दावा केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात बाजार भाव कमी होण्याची भीती आहे. शासनाने यंदाच्या हंगामात तुरीला 7 हजार 550 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव जाहीर केलेला आहे.
पण, अनेक ठिकाणी तुरीला यापेक्षाही कमी दर मिळतोय, यामुळे शेतकरी आधीच चिंतेत असून आगामी काळात जर शासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत तर दर आणखी कमी होण्याची भीती आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच तुरीचा दर हमीभावाच्या आत आल्याने, शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून शेतकऱ्यांची ही अडचण सोडवण्यासाठी शासनाने तातडीने शासकीय खरेदीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे.
शासकीय केंद्र सुरू झाल्यास त्याचा दरांवर दबाव होऊन दर स्थिर होण्यास मदत होऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. पण, खरेदी सुरू करण्याच्या हालचाली न झाल्यास तुरीचा किमान दर आणखी घसरू शकतो, अशी भीती सुद्धा व्यक्त केली जात आहे. यामुळे आता सरकारकडून शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचा निर्णय कधी होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे आणि आगामी काळात बाजार भाव कसे राहतात हे देखील पाहावे लागणार आहे.