Tur Market Rate : राज्यात सोयाबीन, कापूस या नगदी पिकांसमवेतच तुरीची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. तुरीची खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात शेती होते. यावर्षी देखील राज्यातील अनेक भागात तुरीची लागवड करण्यात आली आहे.
परंतु कमी पावसामुळे तूर लागवडीखालील क्षेत्र काहीसे कमी झाले आहे. तसेच पावसाच्या अनियमत्तेमुळे आणि खराब हवामानामुळे तुर पिकावर मोठ्या प्रमाणात रोगराईचा देखील प्रादुर्भाव झाला होता.
वेगवेगळ्या कीटकांचा देखील तुर पिकावर प्रादुर्भाव पाहायला मिळाला होता आणि याचा परिणाम म्हणून तुरीची उत्पादन यंदा मोठ्या प्रमाणात घटले आहे. कमी पावसामुळे आणि खराब हवामानामुळे शेतकऱ्यांना तुरीचे उत्पादन घेण्यासाठी यंदा अधिकचा उत्पादन खर्च करावा लागला आहे.
दरम्यान अधिकचा खर्च करून उत्पादित केलेली तूर आता बाजारात दाखल झाली आहे. राज्यातील विदर्भ विभागातील बहुतांशी बाजार समित्यांमध्ये नवीन तुरीची आवक नमूद केली जात आहे. मात्र बाजार समितीमध्ये तुरीचे दर अजूनही दबावातच आहे.
खरेतर गेल्या काही दिवसांपूर्वी तुरीला दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत होता. परिणामी या चालू वर्षी तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येणार अशी भीती असल्याने नवीन तुरीला असाच विक्रमी दर मिळेल असे शेतकऱ्यांना वाटत होते.
मात्र आता नवीन तुर बाजारात आली असून नवीन तुरीला त्यामध्ये ओलावा अधिक असल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांकडून जुन्या तुरीपेक्षा कमी भाव दिला जात आहे.
नवीन तूर 8700 ते 9000 रुपये प्रति क्विंटल या भावात विकली जात आहे तर जुन्या तुरीला 9300 प्रतिक्विंटल पर्यंतचा भाव मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती एपीएमसी मध्ये दररोज साडेपाचशे ते सहाशे क्विंटल तुरीची आवक होत आहे. यात नव्या तुरीला 8700 ते 9000 असा भाव मिळत आहे तर जुनी तूर 9300 प्रतिक्विंटल पर्यंत विकली जात आहे.
तुरीला किमान दहा हजाराचा भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. तुरीला सात हजार रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव आहे. म्हणजे सध्याचे दर हमीभावापेक्षा अधिक आहेत.
मात्र यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येणार असा अंदाज असल्याने किमान दहा हजाराचा भाव तुरीला मिळाला पाहिजे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तथापि, हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने काही शेतकऱ्यांनी समाधान देखील व्यक्त केले आहे.