Tur Market Price : तुर हे खरीप हंगामात घेतले जाणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पेरणी केली जाते. सोयाबीन, कापूस या पिकांसमवेतच तूर लागवडीखालील क्षेत्र देखील महाराष्ट्रात विशेष उल्लेखनीय आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तुर उत्पादक शेतकरी बांधव संकटात सापडले आहेत. याचे कारण म्हणजे तुरीच्या बाजारभावात गेल्या काही दिवसांमध्ये हजारो रुपयांची घसरण झाली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर 2023 मध्ये तुरीचा भाव हा तब्बल दहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास होता.
मात्र सध्या स्थितीला तुरीचे दर हे क्विंटल मागे दोन ते तीन हजार रुपयांनी घसरले आहेत. याचा परिणाम म्हणून तूर उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.
जर असाच भाव कायम राहिला तर पिकासाठी आलेला खर्च कसा भरून काढायचा हा मोठा सवाल शेतकऱ्यांपुढे आहे. कारण की, खरीप हंगामात झालेल्या कमी पावसामुळे तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे.
सुरुवातीला तुरीचे पीक चांगले होते मात्र नंतर ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने तुरीचे पीक पूर्णपणे बरबाद झाले आहे.
तुरीच्या उत्पादनात मोठी घट येणार अशी भीती आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बाजारात आता नवीन तूर दाखल झाली आहे.
शिवाय आगामी काळात तुरीची मोठ्या प्रमाणात हार्वेस्टिंग होणार असल्याने तुरीची आवक वाढण्याची शक्यता आहे, परिणामी तुरीला भविष्यात काय भाव मिळणार ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली एपीएमसी मध्ये मागील चार दिवसांपासून नवीन तुरीची आवक होत आहे. सध्या या नवीन तुरीला 7399 ते 8251 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे.
म्हणजेच गेल्या काही महिन्यांपूर्वी जो भाव मिळत होता त्यापेक्षा जवळपास दोन ते अडीच हजार रुपयांची कपात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची निराशा होत आहे. तुरीचे भाव किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले पाहिजे अशी शेतकऱ्यांची आशा आहे.
एकीकडे उत्पादनात आलेली मोठी घट आणि दुसरीकडे तुरीला मिळत असलेला कवडीमोल भाव यामुळे शेतकऱ्यांच्या पुढ्यात दुहेरी संकट उभे राहिले आहे.