Tur Market Price : मार्च एंडिंग नंतर आता पुन्हा एकदा राज्यातील बाजार समित्यांमध्ये मोठा प्रमाणात शेतमालाची आवक होत असून राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मार्च एंडिंग नंतर अर्थातच नवीन आर्थिक वर्षात तुरीच्या बाजारभावात सुधारणा पाहायला मिळाली आहे.
नवीन आर्थिक वर्षाची सुरुवातच तुरीच्या दरात वाढीने झाली असल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. खरंतर गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कापूस आणि सोयाबीनला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाहीये.
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पण आता बाजारात तुरीला चांगला विक्रमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून यंदा तुरीच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून तुरीला साडेदहा हजार रुपये प्रति क्विंटल ते 11 हजार रुपये प्रति क्विंटल यादरम्यान बाजार भाव मिळत होता. आता मात्र यामध्ये पाचशे ते सहाशे रुपयांची वाढ झालेली आहे.
तुरीला मिळणारा कमाल बाजार भाव 12,000 प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे तुरीचे बाजार भाव 13 हजार रुपये पर्यंत जाणार का ? हा प्रश्न आहे. खरेतर जेव्हा हंगाम सुरू झाला तेव्हा तुरीला बाजारात अपेक्षित भाव मिळत नव्हता.
जानेवारी नंतर बाजार भाव घसरले होते. नवीन माल बाजारात आल्यानंतर लगेचच बाजारभावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. आगामी काळात भाव वाढ झाली तर ठीक नाहीतर मोठे नुकसान होईल असे शेतकरी बांधवांना वाटत होते.
कारण की त्यावेळी तुरीला अवघा आठ ते साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत होता. दरम्यान बाजारात घसरण झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी तुरीची साठवणूक करण्याचा निर्णय घेतला.
अशातच आता तुरीचे भाव वाढू लागले आहेत. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी तुरीची साठवणूक केलेली असेल त्यांना आता मोठा दिलासा मिळणार असून चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा आहे.
बाजारात तुरीच्या दर्जेदार मालाची कमतरता निर्माण झाल्याने दरात तेजी आली असल्याचे बाजार अभ्यासकांचे म्हणणे आहे. दर्जेदार मालाची बाजारात कमतरता भासत असल्याने अवघ्या आठवडाभरात तुरीचा दर साडेअकरा हजार पार गेला आहे.
शुक्रवारी अकोला येथील बाजारात तुरीला किमान ९००० व कमाल ११ हजार ७४५ रुपये दर मिळाला आहे. सरासरी १०८०० रुपयांचा दर होता. दुसरीकडे वाशीम जिल्ह्यातल्या कारंजा बाजार समितीत तुरीला बारा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल दर मिळत आहे.