Tur Market Price 2024 : महाराष्ट्रात सोयाबीन, कापूस प्रमाणेच तुरीची देखील मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तुरीची लागवड खरीप हंगामामध्ये केली जाते. तुरीची शेती राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आंतरपीक म्हणून होते. तर काही शेतकरी बांधव मुख्य पीक म्हणूनही तुरीची लागवड करत आहेत.
विशेष म्हणजे अलीकडे तुरीला बाजारात चांगला दर मिळत असल्याने तूर लागवड वाढू लागली आहे. अहमदनगरसहित संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात तुरीची लागवड वाढत आहे. तुरीच्या उत्पादनात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र विभागाचा मोठा सिंहाचा वाटा आहे.
दरम्यान राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे तुरीला आता बाजारात चांगला विक्रमी दर मिळू लागला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, यंदा तुरीची काढणी झाली त्या काळात तुरीला फारसा चांगला भाव मिळत नव्हता. यामुळे अधिकचा उत्पादन खर्च करून उत्पादित केलेले तुरीचे पीक यंदा शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचे ठरणार की काय अशी भीती व्यक्त केली जात होती.
पण, हंगाम जसजसा पुढे सरकू लागला तसा बाजारभाव वाढला. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तुरीला चांगला दर मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यातही तुरीला चांगला विक्रमी भाव मिळू लागला आहे.
येथे गेल्या काही दिवसांपासून तुरीचा दर स्थिर असल्याचे दिसत आहे. सध्या नगर येथे दर दिवसाला जवळपास ४० क्विंटलपर्यंत तुरीची आवक होत असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार, या बाजारात तुरीला किमान ९,५०० रुपये प्रतिक्विंटल, कमाल १०,५०० व सरासरी १० हजार रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी दर मिळत आहे.
यामुळे जिल्ह्यातील तुर उत्पादकांना दिलासा मिळत आहे. येथील बाजारात अहमदनगर जिल्हा सहित आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकरी देखील तुर विक्रीसाठी आणत असतात.