Tomato Variety : आपल्याकडे पावसाळी हंगामात सोयाबीन, कापूस अशा विविध पिकांची लागवड केली जाते. याशिवाय काही शेतकरी बांधव टोमॅटो या भाजीपाला पिकाची देखील मोठ्या प्रमाणात लागवड करतात. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या पावसाळी हंगामात टोमॅटोची लागवड करण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने यावर्षी मानसून काळात समाधानकारक पाऊस राहणार असा अंदाज दिला आहे.
जून ते सप्टेंबर 2024 या चार महिन्यांच्या मान्सून काळात यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे यंदा अनेक शेतकरी बांधव टोमॅटोची देखील लागवड करू शकतात.
अशा परिस्थितीत आज आपण टोमॅटोच्या पावसाळी हंगामात लावता येणाऱ्या काही प्रमुख जातींची माहिती जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.
तथापि जर तुम्ही पावसाळी हंगामात टोमॅटोची लागवड करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्या जमिनीच्या मगदूराप्रमाणे, स्थानिक हवामानानुसार योग्य जातींची निवड करणे आवश्यक राहणार आहे. त्यासाठी तुम्ही स्थानिक कृषी सेवा केंद्र चालकाचा किंवा कृषी तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
टोमॅटोच्या पावसाळी हंगामात लावता येणाऱ्या काही प्रमुख जाती
पुसा रुबी : पुसा रूबी हा टोमॅटोचा एक सुधारित वाण असून याची पावसाळी हंगामात लागवड करता येणे शक्य आहे. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या जातीची तिन्ही हंगामात लागवड करता येणे शक्य आहे.
या जातीचे पीक तीन महिन्यात हार्वेस्टिंग साठी तयार होते. या जातीपासून हेक्टरी 325 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.
पुसा गौरव : हा देखील टोमॅटोचा एक सुधारित प्रकार आहे. या जातीची देशातील अनेक प्रमुख टोमॅटो उत्पादक भागांमध्ये लागवड पाहायला मिळते. या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 400 क्विंटल पर्यंतचे दर्जेदार उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातोय.
पुसा शितल : पुसा शितल या जातीची देखील देशातील अनेक राज्यांमध्ये लागवड केली जाते. या जातीपासून हेक्टरी 350 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातोय.
अर्का गौरव : या जातीचे टोमॅटो गडद लाल रंगाचे असतात. या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळत आहे. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 350 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते.