Tomato Farming : बाजारात टोमॅटोला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी बांधव टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. या पिकाची शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते, पण काही प्रसंगी शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघत नाही ही वास्तविकता मात्र नाकारून चालणार नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी टोमॅटोला विक्रमी भाव मिळत होता तेव्हा या पिकाची शेती निश्चितच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरली.
अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या पिकातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले. आता मात्र गेल्या काही महिन्यांपासून याचे बाजारभाव दबावात असून पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नाहीये.
दरम्यान आज आपण भारतात सर्वात जास्त टोमॅटोचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते, आपल्या महाराष्ट्राचा नंबर या यादीत कितवा आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते ?
मध्य प्रदेश : मध्यप्रदेश मध्ये सर्वात जास्त टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. देशाच्या एकूण उत्पादनापैकी 14.63% एवढे उत्पादन मध्य प्रदेश मध्ये घेतले जाते.
आंध्र प्रदेश : सर्वात जास्त टोमॅटो उत्पादन घेतल्या जाणाऱ्या राज्यांच्या यादीत आंध्र प्रदेश राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. देशाच्या एकूण उत्पादनापैकी 10.92% एवढे टोमॅटो उत्पादन आंध्र प्रदेश राज्यात घेतले जाते.
कर्नाटक : आंध्र प्रदेश नंतर कर्नाटक राज्याचा नंबर लागतो. देशाच्या एकूण टोमॅटो उत्पादनापैकी 10.23% एवढे उत्पादनासह कर्नाटक हे राज्य टोमॅटो उत्पादनाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.
तामिळनाडू : देशाच्या एकूण टोमॅटो उत्पादनापैकी तामिळनाडू या राज्यात 7.34% एवढे उत्पादन घेतले जात असल्याची आकडेवारी समोर आले आहे. अर्थातच टोमॅटो उत्पादनाच्या बाबतीत तामिळनाडू राज्याचा चौथा क्रमांक लागतो.
ओडिसा : या राज्यात 7.06% एवढे टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. देशातील सर्वात जास्त टोमॅटो उत्पादन घेणाऱ्या राज्यांच्या या राज्याचा पाचवा क्रमांक लागतो.
टोमॅटो उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा नंबर कितवा
आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा टोमॅटो उत्पादनाच्या बाबतीत कितवा नंबर लागतो. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गुजरात राज्याचा टोमॅटो उत्पादनाचा वापर 6 वा, पश्चिम बंगाल राज्याचा सातवा, छत्तीसगड राज्याचा आठवा आणि आपल्या महाराष्ट्राचा नववा क्रमांक लागतो.
महाराष्ट्रात देशाच्या एकूण टोमॅटो उत्पादनापैकी 5.54% एवढे टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र नंतर बिहार या राज्याचा नंबर लागतो. बिहार टोमॅटो उत्पादनाच्या बाबतीत देशातील दहाव्या क्रमांकाचे राज्य आहे.