Tomato Farming : टोमॅटो हे राज्यासहित देशातील अनेक भागांमध्ये उत्पादित केले जाणारे एक प्रमुख फळ भाजीपाला पीक. या फळ भाजीपाला पिकाची राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये लागवड होते. या पिकाच्या शेतीमधून शेतकऱ्यांना चांगली कमाई सुद्धा होते. मात्र टोमॅटो पिकात नेहमीच काही रोगांचे सावट पायाला मिळते.
चुरडा मुरडा, करपा, मर रोग सारख्या रोगांमुळे टोमॅटो पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित कमाई होत नाही. यामुळे, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रसंगी मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते.
खरे तर टोमॅटो लागवडीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे आणि अशा परिस्थितीतचं या रोगामुळे शेतकऱ्यांचे पीक वाया गेले तर त्यांचे आर्थिक नुकसान होते आणि शेतकऱ्यांची मेहनत पाण्यात जाते. दरम्यान शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या याच आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशातील कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांसाठी टोमॅटोचे एक नवीन वाण विकसित केले आहे.
भारतीय कृषी संशोधन संस्थेने टोमॅटोची ही नवीन जात विकसित केली असून याला पुसा टोमॅटो हायब्रीड 6 असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान आज आपण याच टोमॅटोच्या जातीची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुसा टोमॅटो हायब्रीड 6 च्या विशेषता पुढील प्रमाणे
टोमॅटोची ही एक सुधारित जात असून खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांमध्ये याची लागवड करता येणे शक्य आहे. ही एक उच्च उत्पादन देणारी, उच्च रोगप्रतिरोधक क्षमता असणारी टोमॅटोची अलीकडेच विकसित झालेली जात आहे.
भारतीय कृषी संशोधन संस्थेमधील शास्त्रज्ञांनी टोमॅटो उत्पादकांचे उत्पादन वाढावे या अनुषंगाने या जातीची निर्मिती केली आहे. ही जात टोमॅटो पिकावर येणाऱ्या चार प्रकारच्या रोगांसाठी रोगप्रतिरोधक असल्याचे आढळून आले आहे.
चुरडा मुरडा, उशिरा येणारा करपा रोग, फ्युजेरियम मररोग आणि जिवाणूजन्य मर रोग या चारो रोगांसाठी ही जात रोगप्रतिरोधक असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे साहजिकच टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार आहे आणि त्यांना चांगले दर्जेदार उत्पादन मिळवता येणार आहे.
या जातीमध्ये विविध कीटकांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असल्याने कीटकनाशक आणि बुरशीनाशकांवर होणारा खर्च देखील वाचणार आहे.
टोमॅटोच्या या जातीची लागवड केल्यानंतर साधारणतः 130 ते 150 दिवसात हार्वेस्टिंग सुरु होत असते. या जातीच्या टोमॅटोच्या एका फळाचे वजन हे 80 ते 90 ग्रॅम च्या दरम्यान असते.
जर शेतकऱ्यांनी पावसाळी हंगामात म्हणजेच खरीप हंगामात याची लागवड केली तर यातून त्यांना हेक्टरी 900 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. तसेच जर रब्बी हंगामात म्हणजेच हिवाळी हंगामात याची लागवड केली तर 600 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते.