Tomato Farming : जर तुम्हीही टोमॅटोची लागवड करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर कोणत्याही पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर त्याच्या सुधारित जातींची लागवड करावी लागते.
टोमॅटो पिकाबाबतही अगदी तसेच आहे. या पिकातून चांगले दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातींची लागवड करण्याचा सल्ला दिला जातो. दरम्यान आज आपण टोमॅटोच्या काही प्रमुख जातींची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
टोमॅटोच्या प्रमुख जाती खालील प्रमाणे
पुसा रुबी : टोमॅटोची ही एक सुधारित आणि शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय जात आहे. ही जात उच्च उत्पादन आणि चव यासाठी ओळखली जाते. टोमॅटोची ही जात ८५ दिवसांत तयार होते. या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे.
एक हेक्टरमध्ये 400 ते 450 क्विंटल उत्पादन मिळत असल्याचा दावा कृषी तज्ञांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या टोमॅटोची चव गोड आणि रसाळ असते. यामुळे बाजारात याला चांगली मागणी असते. हा वाण अनेक सामान्य रोगांना प्रतिरोधक आहे. ही जात विविध प्रकारच्या जमिनीत आणि हवामानात तग धरून राहते.
पंत : टोमॅटोचा हा सर्वाधिक उत्पादन देणारा वाण म्हणून ओळखला जातो. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याची उत्पादनक्षमता. ही जात फक्त पॉलिहाऊस आणि ग्रीन हाऊस मध्ये लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आली आहे. पॉलिहाऊस मध्ये या जातीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना 1000 ते 1200 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते.
पण जर मोकळ्या शेतात याची लागवड केली तर यापासून 700 ते 800 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. महत्त्वाचे म्हणजे बाजारात या जातीच्या टोमॅटोला विशेष मागणी असते आणि यामुळे याला चांगला दर मिळतो. हेच कारण आहे की देशातील अनेक टोमॅटो उत्पादक भागांमध्ये याची लागवड पाहायला मिळते.
काशी विशेष : ही सुद्धा टोमॅटोची एक प्रगत जात असून सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या जातींच्या यादीत याचाही समावेश होतो. या जातीचे पीक दुष्काळाचे परिणाम सहन करण्यास सक्षम आहे. हा वाण इतर जातींपेक्षा जास्त उत्पादन देतो. या जातीची फळे गडद हिरवी आणि गोलाकार असतात. या जातीच्या टोमॅटोचे वजन 80-90 ग्रॅम पर्यंत असू शकते.
हे टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस सारख्या रोगास प्रतिरोधक आहे. काशी स्पेशल टोमॅटोचे सरासरी उत्पादन हेक्टरी 600 ते 700 क्विंटल एवढे असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केला आहे. टोमॅटोची ही जात विविध प्रकारच्या हवामानात वाढू शकते आणि कमी तापमान देखील सहन करू शकते.