Farmer Success Story:- शेतीचा जर आपण विचार केला तर सध्या गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे शेती डबघाईला जाताना आपल्याला दिसून येत आहे. कारण बऱ्याचदा शेतीउत्पादन शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी येते आणि अचानक अवकाळी पाऊस आणि गारपीटी सारखे नैसर्गिक संकट कोसळते व उभे पिक जमीन दोस्त होते.
त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. याकरिता आता शेतकऱ्यांनी नुसते शेतीवर अवलंबून न राहता शेतीला सोबत काही व्यवसाय करणे खूप गरजेचे आहे. त्यामध्ये पशुपालन व्यवसाय तर येतोच त्यासोबतच कुक्कुटपालन, शेळीपालना सारखे अनेक व्यवसाय शेतकरी करत असतात
व त्यासोबतच शेतीशी संबंधित काही व्यवसाय करून शेतकऱ्यांनी आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. जर आपण या दृष्टिकोनातून जर विचार केला तर शेतीला जोडधंदा म्हणून जर शेतकऱ्यांनी मशरूम व्यवसाय केला तर या माध्यमातून शेतकरी कमीत कमी खर्चामध्ये लाखो रुपये कमवू शकतात हाच मुद्दा आपण एका शेतकऱ्याच्या उदाहरणावरून या लेखात बघणार आहोत.
मशरूम शेतीतून हा शेतकरी कमावत आहे वार्षिक दहा लाख
याबाबत सविस्तर वृत्त असे की ओडिशा राज्यातील दंड मुकुंदपूर या गावचे रहिवासी असलेले संतोष मिश्रा हे पदवीधर असून घरची दृष्ट्या परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेता येणे शक्य झाले नाही. परंतु या परिस्थितीमध्ये त्यांनी न हारता काहीतरी करावे ही इच्छाशक्ती मनात बाळगली व त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू ठेवले.
याच इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी 1989 मध्ये भुवनेश्वर येथील कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातून मशरूम शेतीचे प्रशिक्षण घेतले व 1989 मध्ये त्यांनी केवळ 36 रुपये भांडवल गुंतवून मशरूम शेतीला सुरुवात केली. आज जर आपण त्यांचा हा व्यवसाय पाहिला तर ओडिसातील पीपली येते त्यांचे भव्य असे कलिंगा मशरूम सेंटर आहे.
संतोष यांनी वडिलांकडून काही पैसे घेतले व काही स्वतःकडील पैसे टाकून एका शेडमध्ये 100 लाद्यांवर 1989 मध्ये प्रथम मशरूम शेती सुरू केली व पहिल्याच वर्षी त्यांना 150 किलोग्रॅम मशरूमचे उत्पादन मिळाले.नंतर त्यांनी हा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले व 60 हजार रुपये कर्ज घेऊन 3000 लाद्यांवर मशरूम व्यवसाय करायला सुरुवात केली.
त्यातून त्यांना त्याकाळी प्रत्येक दिवसाला 2550 रुपये कमाई सुरू झाली व हेच यश पाहून त्यांना 1990 मध्ये मशरूम शेतीसाठीचा महत्त्वाचा मशरूम करोडपती पुरस्कार मिळाला. 1990 च्या दशकात सुरू झालेला त्यांचा हा व्यवसाय आज मोठ्या प्रमाणावर विकसित झाला असून आज त्यांच्या मशरूम फार्मच्या माध्यमातून प्रत्येक दिवसाला दोन हजार गोणी इतके मोठ्या प्रमाणामध्ये मशरूमचे उत्पादन होते.
या माध्यमातून ते आता वर्षाला दहा लाख रुपये कमाई करत आहेत. एवढेच नाही तर ते इतर शेतकऱ्यांना मशरूम शेती विषयीचे प्रशिक्षण देतात व याकरिता ट्रेनिंग कार्यक्रम देखील आयोजित करतात.
अशाप्रकारे आपल्याला मिश्रा यांच्या उदाहरणावरून दिसून येते की परिस्थिती पुढे न हारता जर यामध्ये जबर इच्छाशक्ती असेल तर व्यक्ती कष्टाच्या जोरावर यश मिळवू शकतो.