Thane To Borivali Tunnel : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. वाहतुककोंडीमुळे सर्वसामान्यांचा प्रवास खूपच आव्हानात्मक बनला आहे. ठाणे ते बोरिवली आणि बोरिवली ते ठाणे हा प्रवास करताना देखील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एम एम आर डी ए अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ठाणे ते बोरिवली दरम्यान भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.
ठाणे ते बोरिवली हा प्रवास फक्त वीस मिनिटात व्हावा यासाठी एमएमआरडीएने 11.8 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग प्रकल्प विकसित करणार आहे. या प्रकल्पांतर्गत 10.25 किलोमीटर लांबीचे दोन भुयारी मार्ग तयार होणार आहेत.
याचे काम मेघा इंजीनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या हैदराबाद येथील नामांकित कंपनीला देण्यात आले आहे. खरेतर या प्रकल्पासाठीचे भूमिपूजन गेल्या महिन्यातच होणे अपेक्षित होते.
गेल्या महिन्यात 12 जानेवारीला या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचा एमएमआरडीएचा प्लॅन होता. पण हा प्लॅन यशस्वी झाला नाही. कारण की, या प्रकल्पाला वन्यजीव मंडळाची परवानगी आवश्यक होती.
वन्यजीव मंडळा सोबतच वनविभागाची देखील या प्रकल्पाला परवानगी लागणार होती. त्यामुळे गेल्या महिन्यात या प्रकल्पाचे भूमिपूजन होऊ शकले नाही.
दरम्यान केंद्रीय वन्यजीव मंडळाने या प्रकल्पाला नुकत्याच काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली होती. विशेष म्हणजे केंद्रीय वन्यजीव मंडळाने मंजुरी दिल्यानंतर आता केंद्रीय वन विभागाने देखील या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे.
त्यामुळे या प्रकल्पाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच याचे भूमिपूजन होईल अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे.
जवळपास 16,600 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे बांधकाम या वर्षाच्या अखेरीस सुरू होणार अशी माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर पाच वर्षांच्या आत याचे बांधकाम पूर्ण करायचे आहे. यानुसार हा प्रकल्प 2029-30 पर्यंत सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार अशी आशा व्यक्त होत आहे.