Thane News : राजधानी मुंबई आणि मुंबई उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तसेच दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच एम एम आर डी ए च्या माध्यमातून वेगवेगळी रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या दोन्ही प्राधिकरणाकडून राजधानी मुंबई आणि मुंबई उपनगरातील वाहतूक गतिमान करण्यासाठी सागरी पूल, खाडी पूल, उड्डाणपूल, सागरी मार्ग, एलिव्हेटेड रस्ता यांसारखी बहुउद्देशीय कामे हाती घेण्यात आली आहेत.
ठाणे ते डोंबिवली या दोन उपनगरादरम्यानचा प्रवास सोयीचा करण्यासाठी एमएमआरडीएने असाच एक बहुउद्देशीय प्रोजेक्ट हाती घेतला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, ठाणे ते डोंबिवली दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ट्रॅफिक जामचा मोठा फटका बसत असतो. ट्रॅफिक जाममुळे वेळेत प्रवास करता येत नाही शिवाय मुंबई नासिक महामार्गावरून जर डोंबिवली जाण्याचा विचार केला तर कल्याण वाया जावे लागते.
परिणामी अधिकचा वेळ तिथेही खर्च होतो. यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रवासाला लागणारा अधिकचा वेळ यामधून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एमएमआरडीए म्हणजेच मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी यांनी सिक्स लेन मानकोली पूल आणि उल्हास खाडीवर पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या प्रकल्पाबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे 84 टक्के काम पूर्ण झाले आहे.
मोटागाव-मानकोली खाडी पूलाचे काम हे 84 टक्के झाले आहे म्हणजेच जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. अशा परिस्थितीत हा लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. हा पूल मे 2023 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असा दावा एका मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे. मानकोली मोटागाव लिंक रोड 1.3 किलोमीटर लांबीचा आहे. गेल्या काही वर्षांपासून एमएमआरडीयाने या प्रकल्पावर काम सुरू केले आहे.
सध्या स्थितीला हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून येत्या काही महिन्यात हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याने याचा मोठा फायदा ठाणे आणि डोंबिवली वासियांना होणार आहे. महानगर आयुक्त एस व्ही आर श्रीनिवासन यांनी नुकतेच या प्रकल्पाची पाहणी केली आहे. एकंदरीत मे 2023 पासून हा खाडी पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता लवकरच ठाणे आणि डोंबिवली वासियांना वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळणार आहे.