Super El Nino : यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात महाराष्ट्रसहित देशातील काही राज्यांमध्ये खूपच कमी पाऊस बरसला आहे. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मान्सूनच्या चार महिन्यांच्या काळात सरासरीच्या तुलनेत 12% कमी पावसाची नोंद झाली आहे. एलनिनोमुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचा दावा केला जात आहे. राज्यात कमी पावसामुळे बहुतांशी भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी देखील आगामी काळात भटकंती करावी लागू शकते असे बोलले जात आहे.
अनेक ठिकाणी आत्तापासूनच विहिरींनी तळ गाठला आहे. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात काय परिस्थिती तयार होईल याचा साधा मनात विचार आला तरीदेखील भीती वाटते. दरम्यान यावर्षी झालेल्या कमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील मोठी घट आली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहेत. एकंदरीत यंदाच्या कमी पावसामुळे राज्याच्या विविध भागांमधील शेतकरी बांधव अडचणीत आले आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या नोआ (National Oceanic and Atmospheric Administration) या संस्थेनं जगावर 2024 मध्ये सुपर एल निनोच संकट येणार असा अंदाज वर्तवला आहे.
या संस्थेने 2024 मध्ये मार्च ते मे या कालावधीत अर्थातच तीन महिने सुपर ॲलनिनो सक्रिय राहणार असा दावा केला केला आहे. त्यामुळे अनेकांच्या माध्यमातून सुपर एल निनो म्हणजे काय आणि यामुळे भारतावर काय परिणाम होऊ शकतो, 2024 मध्ये भारतात दुष्काळ पडणार का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान आज आपण याबाबत तज्ञ लोकांनी दिलेली सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
सुपर एल निनो म्हणजे काय ?
सुपर ॲलनिनोपूर्वी आपण एल निनो म्हणजे काय हे समजून घेऊया. एलनिनो ही प्रशांत महासागरात तयार होणारी एक वातावरणीय परिस्थिती आहे. ही प्रशांत महासागरातील तापमानात वाढ झाल्यानंतर तयार होणारी वातावरणीय परिस्थिती आहे. प्रशांत महासागराचे तापमान जेव्हा सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअसने अधिक होते तेव्हा एलनिनो येतो असे म्हटले जाते.
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे प्रशांत महासागराचे सरासरी तापमान हे 26 ते 27 अंश सेल्सिअस राहते. यामध्ये दोन अंश सेल्सिअसची वाढ झाली म्हणजेच 28 ते 29 अंश सेल्सिअस प्रशांत महासागराचे तापमान झाले तर ॲलनिनो येतो. मात्र ज्यावेळी याहीपेक्षा अधिक तापमान होतं त्यावेळी सुपर एल निनो सक्रिय होत असतो. आता सुपर एलनीनो म्हणजे काय हे आपल्याला समजले आहे आता आपण याचा भारताच्या मान्सूनवर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊ.
सुपर एलनिनोचा भारतावर काय परिणाम होणार
एलनिनो आणि भारताच्या मान्सूनचा परस्पर संबंध असल्याचा दावा काही हवामान तज्ञांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मात्र काही हवामान अभ्यासक भारतीय मान्सूनवर एल निनो फारसा परिणाम करत नसल्याचे म्हणतात. विशेष म्हणजे याबाबत तज्ञ लोकांच्या अंदाजात विरोधाभास आहे आणि आकडेवारी देखील अशीच विरोधाभासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1871 नंतर जेवढे दुष्काळ पडले तर त्यापैकी सहा दुष्काळ हे एलनिनोमुळे पडले आहेत. मात्र सर्वच एलनिनो वर्षांमध्ये भारतात दुष्काळ पडलेला नाही.
1997-98 मध्ये एलनिनो प्रचंड सक्रिय असतानाही दुष्काळ पडलेला नाही. म्हणजेच आकडेवारी देखील तज्ञांच्या मताप्रमाणेच विरोधाभासी असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. दरम्यान 2024 मध्ये सुपर एलनिनो येणार आणि यामुळे उत्तर अमेरिकेतील बहुतांशी देशांमध्ये दुष्काळसूत्र परिस्थिती तयार होणार असा अंदाज आहे. दरम्यान यामुळे भारतातही दुष्काळ पडणार का? तर या प्रश्नाचे उत्तर ज्येष्ठ हवामान अभ्यासक डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिले आहे. त्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
ते सांगतात की, भविष्यकाळात फार मोठा दुष्काळ पडेल ही जी भीती तयार केली जात आहे, ती बरोबर नाहीये. कारण की, दुष्काळाला फक्त एल निनो हा एकच फॅक्टर कारणीभूत नाहीये. दुष्काळ पडण्यास अनेक कारणे कारणीभूत असतात. हवामान बदल हा देखील असाच एक महत्त्वाचा घटक आहे ज्यामुळे दुष्काळ पडू शकतो. जागतिक तापमान वाढीमुळे तिथले हवेचे दाब कमी होतात, मग इकडचे वारे जिथं कमी दाबाचं क्षेत्र आहे तिथं जातात, तिथं अतिवृष्टी होते आणि इकडं दुष्काळ पडतो.
ही स्थिती हवामान बदलामुळे होत असल्याची माहिती साबळे यांनी दिली आहे.तर दुसरीकडे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी म्हटल्याप्रमाणे मार्च ते मे या कालावधीत आपल्याकडे उन्हाळा असतो. जर या कालावधीत सुपर ॲलनिनो सक्रिय राहिला तर आपल्याकडील उष्णता नेहमीपेक्षा अधिक वाढू शकते. तसेच या तीन महिन्यांच्या उष्णतेवरच आपल्याकडील मानसूनचे आगमन अवलंबून असेल आणि आपल्याकडील मानसूनवर त्याचा परिणामही होऊ शकतो असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र सुपर एलनिनो सक्रिय आहे की नाही हे आत्तापासूनच ठरवता येणार नाही. ज्यावेळी भारतीय हवामान विभाग एप्रिल महिन्यात मान्सून बाबतचा आपला पहिला अहवाल सादर करेल त्यावेळी याबाबत योग्य ती माहिती मिळू शकणार आहे. एकंदरीत सुपर ॲलनिनो येतो की नाही हे पाहण्यासाठी एप्रिल महिन्यापर्यंत वाट पाहिले तर चांगले होणार आहे. यामुळे आत्तापासूनच सुपर एलनिनोमुळे मनात भीती बाळगण्याची काहीही एक गरज नसल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.