Summer Onion Price Hike : गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. खरंतर कांद्याला कॅश क्रॉप म्हणजेच नगदी पीक म्हणून ओळखल जात. पण या नगदी पिकाने शेतकऱ्यांचा चांगलाच वांदा केला आहे. या पिकामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.
कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. मात्र बकरी ईदचा फायदा महाराष्ट्रासहित देशभरातील कांदा उत्पादकांना झाला आहे. बकरी ईदमुळे पाकिस्तानात सुट्टी असल्याने जागतिक बाजारात भारतीय कांद्याचा बोलबाला राहिला आहे. जागतिक बाजारात कांद्याची मागणी वाढली असून याचा परिणाम म्हणून देशांतर्गत कांदा दरात थोडीशी सुधारणा झाली आहे.
राज्यातील प्रमुख कांदा बाजार पेठ पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव एपीएमसी मध्ये उन्हाळी कांद्याच्या दरात मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे. परंतु जुलै महिन्यात पाकिस्तान मधील कांद्याची आवक वाढणार आहे. यामुळे कांद्याच्या बाजारभावात चढ-उतार सुरू होणार आहे.
पाकिस्तानात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली तर याचा इनडायरेक्ट परिणाम देशांतर्गत कांदा दरावर पाहायला मिळणार असून जुलै महिन्यात चढ-उतार कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र यानंतर परिस्थिती सामान्य होईल आणि कांदा दरात तेजी येईल अशी आशा काही बाजार अभ्यासकांनी वर्तवली आहे.
दरम्यान बकरी ईदची सुट्टी असल्याने काल भारतीय कांद्याची मागणी वाढली आणि याचा परिणाम म्हणून कांदा दरात 50 ते 200 रुपये प्रतिक्विंटल एवढी वाढ झाली. मात्र तीन जुलै नंतर देशांतर्गत कांद्याची मागणी, शेतकऱ्यांकडून कांद्याची होणारी आवक, निर्यातीसाठी कांद्याची असणारी मागणी या सर्व बाबींवर कांद्याचे दर अवलंबून राहणार आहेत.
यामुळे आता जुलै महिन्यात दरात तेजी राहील की नाही हे मागणी आणि पुरवठ्याचे गणितंच स्पष्ट करणार आहे. अशातच बांगलादेशमध्ये कांदा निर्यात करण्यासाठी देशांतर्गत व्यापाऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली आहे.
नाफेड मार्फत देखील कांदा खरेदी सुरू आहे. आगामी काळात बांगलादेशमध्ये निर्यात वाढू शकते असे चित्र तयार झाले आहे. यामुळे सध्या कांदा दरात थोडीशी सुधारणा पाहायला मिळाली आहे. मात्र ही तेजी कायम राहते की नाही याचा अंदाज बांधण्यासाठी आणखी थोडे दिवस वाट पहावी लागणार आहे.