Summer Jowar Sowing : ज्वारी हे देशात उत्पादीत होणारे एक मुख्य पिक आहे. या पिकाची राज्यातील अनेक भागात लागवड केली जाते. यंदा रब्बी हंगामात मात्र ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. कमी पावसामुळे ज्वारीच्या पेरण्यांना फटका बसला आहे.
एवढेच नाही तर ज्या ठिकाणी रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी झाली आहे त्या पेरण्यांना देखील खूपच उशीर झाला आहे. यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे.
बाजाराच्या समीकरणांनुसार जर उत्पादनात घट आली तर निश्चितच ज्वारीचे बाजारभाव कडाडणार आहेत. हेच कारण आहे की, जाणकार लोकांनी यंदाच्या उन्हाळी हंगामात ज्वारी पेरणी करण्याचा सल्ला दिलेला आहे.
या हंगामात ज्वारीला चांगला भाव मिळू शकतो अशी आशा आहे. यामुळे उन्हाळ्यात ज्वारी लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगली कमाई होणार असे बोलले जात आहे.
अशा परिस्थितीत आज आपण उन्हाळी हंगामात ज्वारी लागवड करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे याविषयी थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत.
उन्हाळी ज्वारी लागवड करताना काय काळजी घ्याल
उन्हाळी ज्वारी लागवड उशिराने झाली तर उत्पादनावर याचा परिणाम पाहायला मिळतो. उशिरा लागवड केल्यास अपेक्षित उत्पादन मिळत नाही. यामुळे उन्हाळी ज्वारीची वेळ पेरणी होणे आवश्यक आहे.
जाणकार लोक सांगतात की, फेब्रुवारी नंतर ज्वारीची पेरणी केली तर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते कारण की ऐन फुलोरा अवस्थेत पीक आले असतानाच तापमान वाढलेले असते. यामुळे ज्वारीची पेरणी ही संक्रांत झाल्यानंतर लगेचच करणे गरजेचे ठरते.
15 ते 20 जानेवारी दरम्यान ज्वारीची पेरणी केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते असा दावा तज्ञांनी केला आहे. रात्रीचे तापमान सेल्सिअस दरम्यान असल्यास ज्वारी पेरणी केली तर उत्पादनात चांगली वाढ होते.
उन्हाळी हंगामातून जर अधिकचे कडबा उत्पादन हवे असेल तर खरीप हंगामातील वाणाऐवजी रब्बी हंगामासाठी शिफारशीत वाणाची निवड केली पाहिजे.
कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, मालदांडी-३५-१, परभणी मोती, परभणी ज्योती, फुले रेवती, फुले वसुधा, फुले यशोदा, तसेच अकोला क्रांती या जातींची उन्हाळी हंगामात लागवड करता येऊ शकते.