Sugarcane Farming : ऊस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये लागवड केली जाते. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक बागायती जिल्ह्यांमध्ये उसाची लागवड पाहायला मिळते.
देशातील ऊस उत्पादनाच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मात्र असे असले तरी उसाचे हे पीक अलीकडे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे.
ऊसाला मिळत असलेला भाव पाहता हे कॅश क्रॉप आता शेतकऱ्यांसाठी परवडत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून केली जात आहे. हे कॅश क्रॉप जरूर आहे, मात्र यातून मिळणारी कॅश ही शेतकऱ्यांसाठी खूपच अपुरी पडत आहे.
एकीकडे ऊसाच्या पिकासाठी लागणारा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. इंधन दरवाढ, वाढती मजुरी, कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमती, वाढती महागाई यामुळे उसाचा उत्पादन खर्च वाढला आहे.
दुसरीकडे ऊसाला मिळणारा भाव हा अजूनही अपेक्षित पातळीवर पोहोचलेला नाही. यामुळे या पिकातून शेतकऱ्यांना फारशी कमाई होत नाहीये. अनेकदा तर पिकासाठी आलेला उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्यांना भरून काढता येत नाही.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हेच कारण आहे की आता ऊसाला प्रति टन 5000 चा भाव मिळाला पाहिजे अशी मागणी केली जात आहे. विशेष बाब अशी की, ऊसाला पाच हजाराची एफ आर पी दिली गेली पाहिजे यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनीही जनहित याचिका सुप्रीम कोर्ट मध्ये दाखल केली आहे.
यामुळे सध्या या जनहित याचिकेची ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी चर्चा आहे. याआधी अशी जनहित याचिका सुप्रीम कोर्टात सादर झाली नव्हती. ही पहिलीच वेळ आहे की उसाला एफ आर पी मिळावी यासाठी जनहित याचिका सादर करण्यात आली आहे.
यामुळे सध्या या प्रकरणाची संपूर्ण देशभर चर्चा पाहायला मिळत आहे. माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, उसाचा मूळ रिकव्हरी बेस १०.२५ ऐवजी ८.५ टक्के करून एफआरपी ठरवावी आणि साखरेचे दर द्विस्तरीय करावेत.
त्यामुळे उसाला प्रतिटन ५ हजारांचा दर मिळू शकतो. माने सांगतात की आधी मूळ रिकव्हरी बेस ८.५ टक्के होता. मात्र सीएसीपीच्या शिफारशींमुळे उसाचा दर (एफआरपी) ठरवताना मूळ रिकव्हरी बेस १०.२५ टक्के करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रति टन 1500 पर्यंतचे नुकसान होत आहे.