Sugarcane Farming : ऊस हे महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये उत्पादित होणारे प्रमुख बागायती पीक आहे. या पिकाची राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. उसाची लागवड उत्तर प्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणात होते. मात्र देशातील साखर उत्पादनाचा विचार केला असता गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागत आहे. खरे तर उसाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
पण, अलीकडील काही वर्षांमध्ये हवामान बदलामुळे ऊस पिकातून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याची वास्तविकता आहे. जर तुम्हालाही असाच प्रॉब्लेम येत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे.
कारण की आज आपण उसाच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करताना काय काळजी घेतली पाहिजे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरेतर अनेक शेतकरी बांधव पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ऊसाला पाणी देताना ठिबक सिंचनाचा वापर करतात. मात्र ठिबक सिंचन वापरताना शेतकऱ्यांकडून काही चुका होतात ज्यामुळे त्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही.
यामुळे जर तुम्हीही उसाच्या पिकात ठिबक सिंचनाचा वापर करत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
ठिबक सिंचन प्रणालीने पाणी देतांना ही काळजी घ्या
जर तुम्ही उसाच्या पिकाला ठिबक सिंचनाने पाणी देण्याचा विचार करत असाल तर 16 मिमी व्यास असलेली इनलाईन ड्रीप वापरा. कृषी तज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे, जर तुम्ही मध्यम खोली असलेल्या जमिनीत उसाची लागवड केली असेल तर दोन ठिबक सिंचन नळ्यातील अंतर कमीत कमी 5 फूट ठेवा.
तसेच जास्त खोलीच्या काळ्या जमिनीत दोन ठिबक सिंचन नळ्यातील अंतर ६ फूट ठेवले पाहिजे. या अंतरावर ठिबक सिंचन नळ्या टाकल्या तर पिकाला योग्य पद्धतीने पाणी देता येणे शक्य होणार आहे.
याशिवाय दोन ड्रीपर मधील अंतर हे 40cm एवढे ठेवले पाहिजे आणि ताशी दोन लिटर एवढे पाणी पडेल असा ड्रीपर चा वेग असला पाहिजे.
उसासाठी सब सरफेस ड्रीप सिस्टम सर्वोत्कृष्ट असल्याचे आढळले आहे यामुळे याच ड्रीप सिस्टम चा वापर करावा असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
एकाच वेळी जर जास्त क्षेत्र ओलिताखाली आणायचे असेल तर ताशी एक लिटर पाणी पडेल असे ड्रीपर असणारी इनलाईन वापरणे फायदेशीर ठरणार आहे.