Sugarcane Farming : भारतातील बहुतांश शेतकरी (Farmer) ऊसाची शेती (Sugarcane Farming) मोठ्या प्रमाणावर करतात. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील ऊस या नगदी पिकावर (Cash Crops) मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत.
उसाची शेती आपल्या राज्यात विशेष उल्लेखनीय असून ऊस उत्पादनात (Sugarcane Production) महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. यावर्षी साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्याने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला असून साखर उत्पादनात देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या शिरेपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मात्र असे असले तरी अनेकदा ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना (Sugarcane Grower Farmer) उसाच्या शेतीत नुकसान सहन करावे लागते. ऊस पिकावर रेड रॉट रोग यांसारख्या रोगांमुळे उसाचे उत्पादन कमी होते आणि त्याला बाजारात भाव मिळत नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी शेतकऱ्यांना पीके05191 या जातीची (Sugarcane Variety) ऊस लागवड न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावर्षी उत्तर प्रदेश राज्यात उसाच्या PK05191 जातीच्या पेरणी आणि लागवडीवर बंदी घालण्यात आली आहे. कारण की या जातीच्या उसावर रेड रॉट रोग लवकर येतो. यासोबतच उसाचे दोन नवीन वाणही बाजारात आणण्यात आले असून त्यामुळे साखरेचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नवीन वाणांमुळे साखरेचा उतारा वाढणार
वास्तविक बियाणे ऊस आणि ऊस वाण मान्यता उपसमितीने उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन नवीन वाणांना मान्यता दिली आहे. या जातींमध्ये कोशा 17231 आणि यूपी 14234 यांचा समावेश आहे. या वाणांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा तर येईलच, शिवाय पिकाच्या योग्य व्यवस्थापनातून साखरेचा उतारा वाढून उत्पादनही वाढेल. निश्चितच सध्या तरी उत्तर प्रदेश राज्यात या जातींची लागवड केली जाणार आहे. मात्र भविष्यात महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी देखील नवीन सुधारित जाती विकसित केल्या जातील.
रेड रॉट रोग लागत नाही
अहवालानुसार, ओसाड जमिनीवरही UP14234 ऊस जातीची लागवड केल्यास बंपर उत्पादन मिळेल. अशाप्रकारे, ही जात उत्तर प्रदेशातील कमी सुपीक भागातही अधिक उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय, संसाधनांची कमतरता असलेल्या भागातही, UP14234 पासून तुम्ही उसाचे उत्तम उत्पादन घेऊ शकाल. दुसरीकडे, ऊसाचा दुसरे नवीन वाण, Co.S.17231 ऊस हा रोग प्रतिरोधक वाण आहे, ज्यावर लाल कुज या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. या वाणामुळे चांगल्या लांबीच्या आणि जाडीच्या ऊसाचे उत्पादन मिळून चांगली उत्पादन क्षमता मिळते.