Sugarcane Farming : ऊस हे राज्यासहित देशातील अनेक भागात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. अलीकडे देशातील काही भागांमध्ये ऊस लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ऊसाचे पेमेंट वेळेवर होत असल्याने, इथेनॉल निर्मितीत उसाचा वापर वाढत असल्याने, ऊसाला आता चांगला दर मिळू लागल्याने ऊस लागवडीखालील क्षेत्र देशातील काही भागांमध्ये विस्तारले आहे.
शेतकऱ्यांना ऊसाची शेती आता परवडू लागली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील ऊस उत्पादकांची ऊस तोडणी मजूर आणि वाहतूकदारांकडून मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जात आहे.
यामुळे राज्यातील काही शेतकऱ्यांनी इतर पर्यायी पिकांचा शोध घेतला आहे. तथापि, राज्यात अजूनही मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जात आहे.
दरम्यान आज भारतीय शास्त्रज्ञांनी अलीकडेच विकसित केलेल्या उसाच्या एका नवीन वाणाची माहिती जाणून घेणार आहोत. खरेतर कोणत्याही पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर त्याच्या सुधारित वाणाची लागवड करणे आवश्यक असते.
अशा परिस्थितीत उसाच्या पिकातूनही चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी त्याच्या सुधारित वाणाची निवड करणे आवश्यक राहणार आहे. यामुळे आज आपण उसाच्या एका नवीन जातीची माहिती पाहणार आहोत.
ऊसाची नव्याने विकसित झालेली जात
उसाची ही एक सुधारित जात असून हा वाण गेल्या वर्षी शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे. भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनौ (उत्तर प्रदेश) च्या शास्त्रज्ञांनी 2023 साली ऊसाची ही जात विकसित केली असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे.
या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हा वाण कोणत्याही क्षेत्रात उत्पादित केला जाऊ शकतो. या जातीची पेरणी उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये नोव्हेंबर ते मार्च महिन्यात केले जाऊ शकते अशी माहिती तज्ञांनी दिली आहे.
ऊसाची ही जात एकरी ५०० क्विंटलपर्यंत उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा जाणकार लोकांनी केला आहे. या जातीला इक्षू-11 असेही म्हणतात.
COLK-15201 ची लांबी जास्त असते आणि या जातीच्या पिकात फुटव्यांची संख्या देखील अधिक राहते. या ऊसात साखरेचे प्रमाण १७.४६ टक्के आहे जे इतर जातींच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे या जातीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.