Sugarcane Farming : महाराष्ट्रात ऊसाची मोठ्या प्रमाणात शेती होते. राज्यातील प्रमुख बागायती भागांमध्ये या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते.
साखर उत्पादनाचा विचार केला असता गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात उत्तर प्रदेश पेक्षा जास्तीचे साखरेचे उत्पादन होत आहे. देशातील एकूण साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा पहिला नंबर लागत आहे.
यावरून ऊस पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असल्याचे स्पष्ट होते. आपल्याकडे ऊस उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात खोडवा उत्पादन घेतात.
पण, खोडवा ऊस पिकातून दर्जेदार उत्पादन मिळवायचे असल्यास खतांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक असते. जर खोडवा ऊसाला योग्य पद्धतीने खते मिळाली नाहीत तर उत्पादनात घट येते.
यामुळे आज आपण खोडवा ऊसाला कोण-कोणती खते दिली पाहिजेत? या संदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खोडवा ऊस पिकाचे खत व्यवस्थापन कसं असावं?
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरू ऊसाप्रमाणेच खोडवा ऊसाला देखील अन्नद्रव्यांची गरज भासत असते.
त्यामुळे खोडवा उसाचे उत्पादन घ्यायचे झाल्यास ऊस तुटल्यानंतर 15 दिवसांनी किंवा याच्या आधीच 50 किलो नत्र, 23 ते 25 किलो स्फुरद आणि 23 ते 25 किलो पालाश या प्रमाणात अन्नद्रव्यांची पूर्तता केली पाहिजे.
यानंतर 130 दिवसांनी पुन्हा एवढीच खताची मात्रा पिकाला देणे अपेक्षित आहे. जर समजा पिकात सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून आली तर या सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता केली पाहिजे.
यासाठी एकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट आणि ४ किलो मँगेनीज सल्फेट व २ किलो बोरॅक्स ही सूक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रिय खतांमध्ये मिसळून दिली पाहिजेत, असा सल्ला तज्ञांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
जर शेतकऱ्यांनी खोडवा ऊस पिकात अशा पद्धतीने खताचे व्यवस्थापन केले तर उत्पादनात वाढ होऊ शकते असा दावा तज्ञांनी केला आहे.