Successful Farmer : मित्रांनो खरे पाहता भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. हे जरी शास्वत सत्य असले तरीदेखील भारतासारख्या पुरुष प्रधान देशात आज देखील शेतीमध्ये (Farming) महिलांचे योगदान केवळ मदत म्हणून पाहिले जात आहे. परंतु आता परिस्थिती हळूहळू बदलत आहे. आता महिला शेतकरी (Women Farmer) शेतीमध्ये आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर नवीन यशोगाथा लिहिण्यास सुरवात करत असल्याचे चित्र आहे.
झारखंड मधील एका महिलेने देखील पुरुष प्रधान व्यवस्थेला मोठा घाव घालत शेती व्यवसायात स्वतःच्या जोरावर नेत्रदीपक यश संपादन केले आहे. बांका जिल्ह्यातील महिला शेतकरी सविता देवी यांनी शेती पूरक व्यवसाय (Agriculture Business) म्हणून पशुपालन (Animal Husbandry) सुरू केले आहे.
विशेष म्हणजे या व्यवसायात ही महिला स्वावलंबी बनून चारा आणि पाणी यापासून ते दूध काढण्याचे काम देखील ती स्वताच करत आहे. फक्त सविता देवीच नाहीतर त्यांच्या गावातील बहुतांश महिला देखील पशुपालन व्यवसायातील सर्व कामे स्वतःच करत आहेत.
मित्रांनो बांका येथील सिजुआ गावातील सविता यांच्याकडे एक हेक्टर जमीन आहे. तिने 2007 मध्ये होल्स्टेन फ्रिशियन या विदेशी गायीपासून दुग्ध व्यवसाय (dairy farming) सुरू केला. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. गाईला दरवर्षी गर्भधारणा होण्यास त्रास होत असे. यासाठी त्यांनी बांका येथील कृषी विज्ञान केंद्र आणि एटीएमए कार्यालयाशी संपर्क साधला. अखेर शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार सविता देवी यांनी चांगल्या उत्पन्नासाठी शास्त्रोक्त पद्धतीने दुग्धव्यवसाय सुरू केला. आणि शेवटी त्यांना दुग्ध व्यवसायातून चांगली कमाई होण्यास सुरुवात झाली.
पशु आहारावर देतात विशेष लक्ष
सविता देवी यांनी पेंढ्यावर युरियाची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे चाऱ्याचे पोषणमूल्य वाढले. युरियासह उपचार केलेल्या पेंढ्यातील प्रथिने सामग्री सुमारे 9% असते. याशिवाय मिनरल्सने युक्त आहार देण्यास सुरुवात केली. चांगल्या दुग्धोत्पादनासाठी हिरवा चाऱ्याबरोबरच पौष्टिक धान्य आणि दुभत्या जनावरांना हिरवा चारा देणे अत्यंत आवश्यक आहे. जाणकार लोकांच्या मते हिरवा चारा जनावरांच्या आतील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करतो. यामुळेच दुग्ध उत्पादनात वाढ झाल्याचे सविता देवी यांनी देखील सांगितले.
हिरवा चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्स तंत्र वापरले
सविता देवी यांनी सांगितले की, पशुधनासाठी हिरव्या चाऱ्यासाठी हायब्रीड नेपियर, बरसीम, क्लस्टर बिन आणि चवळी या पिकांची ते आपल्या शेतात लागवड करतात. सविता देवी यांच्या मते, वर्षभर हिरवा चारा मिळत नाही यामुळे त्या हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने हिरवा चाराही तयार करतात. सविता देवी सायलेज पद्धतीने चारा साठवतात. दुभत्या जनावरांना पेंढ्याऐवजी सायलेज दिल्यास त्यांचे दूध उत्पादन वाढते. पावसाळ्यात गरजेपेक्षा हिरवा चारा उपलब्ध होतो. हा चारा सायलेज पद्धतीने जतन केल्यास कोरड्या हंगामात व चाऱ्याची कमतरता व टंचाईच्या काळात जनावरांना पोषक चारा सायलेज स्वरूपात दिला जातो.
गावातील लोक दुग्ध देखील व्यवसायाकडे वळले बर
सवितादेवी यांच्याकडे आजच्या घडीला एकूण 15 गायी आहेत. या पंधरा गाईंपासून त्यांना दररोज 150 लिटर दूध मिळत असते. त्यांच्या गाईपासून मिळालेले दूध त्या सुधा डेअरीला विकतात. दुधाच्या विक्रीतून तसेच कंपोस्ट युनिटमधून तिला चांगले उत्पन्न मिळत आहे. सविता देवी यांच्या प्रयत्नांमुळे आणि त्यांच्या प्रेरणेमुळे आज त्यांच्या गावातील प्रत्येक कुटुंबाकडे दोन गायी आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या गावातील गावकरी देखील सुधा डेअरीलाच दूध विकतात.
दुप्पट नफा मिळतो बर…!
सविता देवी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, त्यांना दुग्धव्यवसायासाठी वर्षाला सुमारे 83 हजार रुपये खर्च येतो. यातून त्यांना सुमारे एक लाख 24 हजार रुपये कमाई देखील होतं आहे. अशा प्रकारे त्यांना सुमारे 41 हजार रुपयांचा नफा राहतो. सविता देवी त्यांच्या परिसरातील शेतकऱ्यांना सायलेज पद्धती आणि हायड्रोपोनिक्स तंत्राबाबत प्रशिक्षणही देतात.
दुग्धव्यवसायातून सिजुआ गावातील लोकांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. सविता देवी यांनी सांगितले की त्यांच्या गावातील 50 कुटुंबांपैकी सुमारे 43 कुटुंबांकडे संकरित गायी आहेत. आजमितीस, गावातील दुग्धव्यवसायातून वर्षाला 17 लाख रुपये आणि शेतीतून 23 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. निश्चितच सविता देवी यांनी त्यांचे स्वतःचे आणि गावातील शेतकऱ्यांचे देखील भविष्य उज्ज्वल केले आहे.