Successful Farmer : अलीकडे शेतकऱ्यांसमोर वेगवेगळी आव्हाने उभी आहेत. विविध नैसर्गिक संकटांमुळे आता शेतीचा व्यवसाय खूपच रिस्की बनला आहे. वाढती महागाई, वाढलेले इंधनाचे दर, वाढती मजुरी या सर्व पार्श्वभूमीवर आता शेतीचा खर्च वाढला आहे.
एकीकडे उत्पादन खर्च वाढत आहे तर दुसरीकडे शेतीमधून मिळणारे उत्पादन कमी होत चालले आहे. शिवाय बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाहीये. यामुळे अनेकांनी आता शेतीचा व्यवसाय सोडला आहे.
अनेकांची शेतीपेक्षा इतर उद्योगधंदे बरे अशी धारणा बनली आहे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील काही शेतकऱ्यांनी आपल्या प्रयोगाच्या जोरावर शेतीमधून लाखोंची कमाई करून दाखवली आहे.
आज आपण नासिक मधल्या अशाच एका अवलिया शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत. ज्याने अवघ्या तीन एकर जमिनीतून 36 लाखांची कमाई केली आहे. अर्थातच या अवलिया शेतकऱ्यांनी एकरी बारा लाख रुपयांची कमाई केली आहे.
कोण आहे तो अवलिया
या अवलिया शेतकऱ्याचे नाव आहे माणिकराव पिंपळे. पिंपळे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना पारंपारिक पिकातून फारशी कमाई होत नव्हती. मग काय त्यांनी पीक पॅटर्न मध्ये बदल केला.
पारंपारिक पिकांऐवजी त्यांनी बाजारपेठांमध्ये मागणीत असलेल्या पिकांची शेती सुरू केली. या पार्श्वभूमीवर त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. त्यांनी तीन एकर जमीनीत स्ट्रॉबेरीची लागवड केली.
दरम्यान त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून आता त्यांना एकरी बारा लाख रुपयांची कमाई होणार आहे. यामुळे सध्या माणिकरावांच्या या प्रयोगाची पंचक्रोशीत विशेष चर्चा पाहायला मिळत आहे.
एकरी किती खर्च आला
स्ट्रॉबेरीचे पीक हे थंड हवामानात येणारे पीक आहे. या पिकातुन कमी खर्चात चांगली कमाई होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन माणिकराव यांनी तीन एकर जमिनीत याची लागवड केली. दरम्यान, तीन एकर जमिनीत स्ट्रॉबेरी लागवड करण्यासाठी त्यांना जवळपास सहा लाख रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागला आहे. म्हणजेच एकरी दोन लाख रुपये एवढा खर्च त्यांनी केला आहे. यामध्ये रोपे, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन इत्यादीं खर्चाचा समावेश होतो.
किती कमाई झाली
माणिकराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्ट्रॉबेरी लागवड केल्यानंतर अवघ्या दोन महिन्याच्या काळात यातून उत्पादन मिळते. एका एकरात जवळपास 22 हजार स्ट्रॉबेरीची रोपे लागतात. दरम्यान या तीन एकरात लागवड केलेल्या स्ट्रॉबेरीतून त्यांना दहा टन पर्यंतचे उत्पादन मिळणार आहे.
बाजारात स्ट्रॉबेरीला 300 ते 400 रुपयांपर्यंतचा भाव मिळतो. अशा तऱ्हेने त्यांना या दहा टन स्ट्रॉबेरी मधून जवळपास 36 लाख रुपयांपर्यंतची कमाई होणार आहे. म्हणजेच त्यांना खर्च वजा जाता जवळपास 30 लाख रुपयांपर्यंतची कमाई होणार आहे.