Successful Farmer : अलीकडे शेतीमध्ये शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी बांधव संकटात आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट यांसारख्या एक ना अनेक संकटांमुळे शेतीतून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे.
यावर्षी देखील महाराष्ट्रावर दुष्काळाचे भीषण सावट पाहायाला मिळत आहे. दुष्काळामुळे यावर्षी शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन घेता आलेले नाही. सोयाबीन, कापूस, मका समवेतच सर्वच पिकाला दुष्काळाचा फटका बसला आहे. शिवाय बाजारात सोयाबीन आणि कापसाला अपेक्षित असा भावही मिळत नाहीये.
सध्या बाजारात नवीन सोयाबीन आणि कापसाची आवक होत असून या दोन्ही शेतमालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मात्र कांद्याच्या बाजारभाव चांगली तेजी आली आहे. परंतु शेतकऱ्यांकडे खूपच कमी प्रमाणात कांदा शिल्लक आहे. शिवाय अनेकांना खरीप हंगामातील कांद्याचे देखील चांगले उत्पादन मिळालेले नाहीये.
यामुळे या दरवाढीचा फारच मोजक्या शेतकऱ्यांना फायदा होत आहे. एकूणच काय की निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये आणि जर चांगले उत्पादन मिळाले तर शेतमालाला चांगला भाव मिळत नाही अशी बिकट परिस्थिती तयार होत आहे. यामुळे शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे.
मात्र या अशा प्रतिकूल आणि विपरीत परिस्थितीमध्ये देखील राज्यातील काही शेतकऱ्यांनी आपल्या चौकस बुद्धीने आणि जिद्दीच्या जोरावर शेतीतून लाखोंचे उत्पन्न कमवून दाखवले आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील मौजे भोसी येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील दुष्काळाच्या सालात फळबागेतून लाखोंची कमाई करून दाखवली आहे.
भोसी येथील नंदकिशोर गायकवाड या प्रयोगशील शेतकऱ्याने तब्बल ५० फळांची लागवड केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी माळरानावर फळबाग फुलवली आहे. ज्या माळरानावर कोणत्याच पिकाची लागवड करता येऊ शकत नाही अशा माळरानावर गायकवाड यांनी 50 प्रकारच्या फळांची लागवड करून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. विशेष म्हणजे युवा शेतकरी नंदकिशोर गायकवाड हे उच्चशिक्षित आहेत.
त्यांनी बीएपर्यंतचे शिक्षण घेतले आहे शिक्षणानंतर तब्बल पाच वर्षे त्यांनी एमपीएससीचा अभ्यास देखील केला आहे. मात्र पाच वर्षे मेहनत घेतल्यानंतरही त्यांना एमपीएससी मध्ये यश मिळवता आले नव्हते. म्हणून कोरोना काळात ते गावाकडे परतले. गावाकडे आल्यानंतर त्यांनी कोरोनामध्ये शेती सुरू केली. आपल्या ज्ञानाचा त्यांनी शेतीमध्ये वापर केला आणि आपल्या जिद्दीच्या आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी शेती व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे.
गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या माळरानावर कोणतेच पीक घेतले जात नव्हते त्या १० एकर माळरान जमिनीवर त्यांनी फळबाग लागवड केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी या माळरानावर एकाच फळाची लागवड केली आहे असे नाही तर अंबा, पेरू, चिकू, जांभूळ, डाळिंब, सीताफळ, रामफळ, एव्हढच नाहीतर काजू, सफरचंद, अंजीर, विलायची अशा 50 प्रकारच्या फळांची लागवड केली आहे.
यातून त्यांना आता चांगले उत्पन्न देखील मिळत आहे. गेल्या वर्षी त्यांना फळबागेतून तेरा लाखांची कमाई झाली होती. यंदा तर कमाईचा आकडा सात लाखांनी वाढणार आहे. यावर्षी त्यांना फळबागेतून वीस लाखांपर्यंतची कमाई होईल अशी आशा आहे. निश्चितच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि तब्बल पाच वर्षे घरापासून दूर राहणाऱ्या युवा शेतकऱ्याने शेतीमध्ये साधलेली ही प्रगती इतर प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी देखील प्रेरणादायक राहणार आहे यात शंकाच नाही.