Successful Farmer: भारत खरे पाहता एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशाची अर्थव्यवस्था देखील शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून आहे. मात्र असे असले तरी शेतीमध्ये शेतकरी बांधवांना (Farmer) सातत्याने तोटा सहन करावा लागत असल्याने आता नवयुवक शेतकरी पुत्र शेतीऐवजी आपली नोकरीच बरी असा युक्तिवाद करत असल्याचे नजरेस पडत आहेत.
मात्र जर शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला शेतीला शेती पूरक व्यवसायाची (Agri Business) सांगड घातली तर निश्चितच शेतीमधून लाखों रुपये उत्पन्न सहजतेने कमावता येते. उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad) अवघ्या 17 वर्षीय शेतकरी पुत्राने हे दाखवून दिले आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात या शेतकरी पुत्राची चांगलीच चर्चा रंगली आहे.
उस्मानाबाद मधील वाशी शहराजवळ झिन्नर येथील सतरा वर्षीय समाधान काळे या शेतकरी पुत्राने शेती पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जाणारा पशुपालन व्यवसायात (animal husbandry) सतराव्या वर्षी यशाची गिरीशिखरे सर करून दाखवले आहेत. खरे पाहाता समाधान काळे यांचे वडील विष्णू काळे यांच्याकडे सहा एकर शेतजमीन आहे. मात्र, शेतीतून कवडीमोल उत्पन्न त्यांना मिळत आहे. म्हणून 17 वर्षीय समाधान यांनी शेतीमध्ये बदल करत पशुपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सध्या समाधान यांना दुग्ध पालन व्यवसायातून महिन्याला 40 हजारांची कमाई होत आहे.
मित्रांनो समाधान यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. दहावीला समाधानला चांगले समाधान कारक गुण मिळाले नाहीत. त्यामुळे समाधान यांनी तेव्हाच पुढे शिक्षण घ्यायचे नाही असे ठरवले. समाधान दहावी पास आऊट झाल्यानंतर कोरोना आला, यामुळे होती नव्हती ती शिकण्याची इच्छा देखील समाधान यांची पुसली गेली. मग काय या शेतकरी पुत्राने शेतीमध्येच काहीतरी जरा हटके करू असा निर्णय घेतला. यासाठी या शेतकरी पुत्राने आपल्या वडीलांकडे एका गाईची मागणी केली.
समाधान यांच्या वडिलांनी आपल्या मुलासाठी एक 70 हजार रुपयांची गाय विकत आणली आणि आता तू या व्यवसायात तुझ्या स्वतःच्या बळावर लढ असा सल्ला दिला. समाधान यांनीदेखील आपल्या वडिलांच्या विश्वासावर खरे उतरून दाखवले. समाधान यांना सुरुवातीच्या काळात एका गाईपासून दिवसाला तीस एकतीस लिटर दूध मिळत असे यातून ते खवा तयार करून बाजारात विकत असत. त्यानंतर त्यांनी अजून एक गाय विकत आणली.
पुढे अजून दोन गाई विकत घेतल्या आता समाधान यांनी दोन गाईच्या चार गाई केल्या. सुरुवातीला समाधान यांना या व्यवसायातून फारसा नफा मिळत नव्हता मात्र तोटा देखील झाला नाही. यामुळे जिद्दी समाधान ये हार न मानता व्यवसाय सुरूच ठेवला. आता समाधान यांना या व्यवसायातून चांगला नफा मिळत आहे. गाईला चारा मिळावा यासाठी समाधान यांनी आपल्या अर्ध्या एकर क्षेत्रात चार्याची लागवड केली आहे.
सध्या चार गाईंपासून समाधान यांना 100 लिटर पर्यंत दूध मिळत असून या पासून 20 ते 22 किलो खवा तयार होत आहे. समाधान यांच्या मते, ते 145 रुपये किलो या दराने खव्याची विक्री करत असून सध्या त्यांना या व्यवसायातून महिन्याकाठी खर्च वजा करता 40 हजारांची कमाई होत आहे. निश्चितच शेतकरी पुत्राने नोकरदाराला लाजवेल असं काम करून दाखवल आहे. निश्चितच समाधान यांनी शेतीमध्ये केलेली ही कामगिरी इतर तरुण शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरणार आहे.