Success Story : एकीकडे नवयुवक शेतकरी पुत्र शेतीमध्ये आता आधीसारखी मजा राहिली नाही, शेतीमध्ये काही कस नाही, शेतीतून चांगली कमाई होत नाही असे एक ना अनेक कारणे पुढे करत शेतीपासून दुरावत असल्याचे चित्र आहे.
नवयुवक शेतकरी तरुण आता शेती ऐवजी नोकरीला प्राधान्य देत असून नोकरीसाठी गावाकडून मोठ्या प्रमाणात शहरात स्थलांतर होत आहे. ही एक चिंतेची बाब असून यामुळे आता गावे ओसाड पडू लागले आहेत. मात्र अशा या परिस्थितीमध्ये अनेक असे नवयुवक तरुण आहेत जे शेती क्षेत्रातून चांगली कमाई करत आहेत.
विशेष म्हणजे काही नोकरीवर असलेल्या लोकांनी देखील आता नोकरीवर तुळशीपत्र ठेवत पुन्हा एकदा शेती सुरू केली आहे. दरम्यान आज आपण अशाच एका शेतकऱ्याची माहिती जाणून घेणार आहोत ज्याने आयटी क्षेत्रातील लाखो रुपयांची नोकरी सोडून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत लाखोंचे उत्पन्न करून दाखवले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील मौजे वाकडी येथील विक्रांत काळे नामक तरुणाने आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून गावी परतत वडिलोपार्जित शेती सुरू केली आहे. यामध्ये त्याने नवनवीन प्रयोग राबवले आहेत. त्याने चक्क पांढऱ्या जांभळाची लागवड करून दाखवली आहे. विक्रांत काले यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी याआधी सफरचंद लागवडीचा प्रयोग देखील केला असून तो प्रयोगही यशस्वी झाला आहे.
ते सांगतात कि, नोकरीमध्ये मन रमत नसल्याने त्यांनी गावी परतत शेती फुलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पांढऱ्या जांभळ्याच्या लागवडीबाबत माहिती देताना सांगितले की, तीन वर्षांपूर्वी 12 बाय 12 फूट अंतरावर या पांढऱ्या जांभळाची लागवड केली.
एकरी जवळपास 325 झाडे त्यांनी लावलीत. जांभूळ लागवड केल्यानंतर त्यामध्ये आंतरपीक देखील त्यांनी घेतले. यातून जांभूळ बाग जोपासण्यासाठी आलेला खर्च त्यांना भरून काढता आला आहे. आता, जांभळापासून त्यांना उत्पादन मिळत असून 250 रुपये प्रति किलो असा भाव पांढऱ्या जांभळाला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
एका झाडापासून जवळपास सात ते आठ किलो फळे मिळत असून एकरी तीन लाख 25 हजार पर्यंतची कमाई त्यांना होण्याची आशा आहे. विशेष म्हणजे आगामी एक ते दोन वर्षात जांभूळ बागेतून मिळणारे उत्पादन वाढणार आहे. भविष्यात एका झाडापासून जवळपास 25 किलो पर्यंतचे उत्पादन त्यांना मिळण्याची आशा आहे.
अर्थातच पांढऱ्या जांभळाच्या लागवडीतून त्यांना नजीकच्या काळात आणखी चांगले उत्पादन मिळणार आहे. निश्चितच आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून पांढऱ्या जांभूळ लागवडीचा केलेला हा प्रयोग इतर तरुणांसाठी मार्गदर्शक राहणार आहे. यामुळे शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल असा आशावाद व्यक्त होत आहे.