Success Story : जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची अंगात धमक असेल तर या जगात अशक्य असे काहीच नाही. याचेच एक उत्तम उदाहरण आहेत सोलापूर जिल्ह्यात जन्मलेले आणि सध्या झारखंड मधील कोडरमा या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावत असलेले रमेश घोलप. खरंतर घोलप यांना अगदी बालपणीच पोलिओमुळे अपंगत्व आले आहे.
मात्र अपंगत्वावर मात करत या ध्येयवेड्या, अवलियाने भल्याभल्यांना लाजवेल अस काम करून दाखवलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याच्या महागाव येथे जन्मलेले रमेश घोलप यांनी 2013 मध्ये संपूर्ण देशात 287 वी रँक घेऊन यूपीएससीची परीक्षा सर केली. विशेष म्हणजे 2013 मध्ये त्यांनी एमपीएससीच्या परीक्षेत देखील महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला होता.
म्हणजेच त्यांनी एकाच वर्षात एमपीएससी आणि यूपीएससी ची खडतर परीक्षा पास करून दाखवली आहे. याहून विशेष बाब अशी की, घोलप मुक्त विद्यापीठातून पदवीधर आहेत आणि ते मुक्त विद्यापीठातून पदवीधर असतानाही आयएएस बनलेले एकमेव उमेदवार आहेत. घोलप यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बेताची होती. आई दुसऱ्यांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करायची तर वडील सायकल रिपेरिंगचे दुकान चालवत असत.
मात्र वडिलांना रमेश लहान असताना दारूचे व्यसन लागले. व्यसनामुळे आधीच बेत्याची असलेली आर्थिक परिस्थिती आणखीच गोत्यात आली. कित्येकदा तर घरात चूल देखील पेटत नसत. यामुळे आईने शेतमजुरीतुन घरगाडा भागत नसल्याने बांगडी विक्रीचा व्यवसाय करण्याचे ठरवले. सुरुवातीला घरातून या व्यवसायाला विरोध झाला. मात्र पोरांच्या शिक्षणासाठी तीने हा व्यवसाय केलाच. घोलप देखील आपल्या आईला या व्यवसायात मदत करत असत.
या अशा हलाखीच्या परिस्थितीतच त्यांचे शिक्षण झाले आहे. घोलप यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्याच गावातील झेडपीच्या शाळेत झाले. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्यांना पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत जावे लागणार होते. मात्र त्यांना अपंगत्व असल्याने पाच ते सहा किलोमीटर प्रवास करणे अशक्य होते. अशा परिस्थितीत त्यांना शिक्षणासाठी त्यांच्या मामाकडे पाठवण्यात आले.
त्यांचे मामा म्हाडा तालुक्यातील अरण येथे वास्तव्यास होते. तिथेच त्यांचे पुढील शिक्षण म्हणजे दहावी बोर्ड पर्यंतचे शिक्षण झाले. यानंतर बार्शी येथे त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांची बारावीची परीक्षा तोंडावर आली असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. यामुळे परीक्षा द्यावी की नाही याबाबत ते संभ्रमावस्थेत होते. मात्र त्यांच्या शिक्षकांनी त्यांना परीक्षा देण्यास भाग पाडले. त्यांनी परीक्षा दिली आणि चांगल्या गुणांनी ते बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेत.
बारावीनंतर इतर मुलांप्रमाणे त्यांचे देखील मेडिकल किंवा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्याचे स्वप्न होते. मात्र आर्थिक परिस्थिती ही खूपच हालाखीची यामुळे हे शिक्षण घेणे त्यांना परवडणारे नव्हते. शिवाय त्यांच्या मनाला देखील हे पटणार नव्हते. यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाला लवकरात-लवकर आर्थिक हातभार लावता येईल असं काहीतरी करू या दृष्टिकोनातून डीएड करण्याचा निर्णय घेतला.
डीएड नंतर त्यांना शिक्षक म्हणून नोकरीही मिळाली. पोरगा शिक्षक झाला म्हणून त्यांच्या आईला भलताच आनंद झाला. आईने संपूर्ण गावाला पेढे भरवले. शिक्षक झालेत मात्र लहानपणापासूनच त्यांना कलेक्टर बाबत मोठ आकर्षण होते. यामुळे शिक्षकाच्या नोकरीत त्यांचे मनच रमेना. त्यांच्या आईने मात्र त्यांच्या मनातील ही घालमेल ओळखली आणि लेका तुला जे करायचंय ते कर असं म्हणत त्यांच्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी त्यांना पुण्यात पाठवले.
2009 मध्ये ते पुण्यात आले. सुरुवातीला त्यांना तहसीलदार व्हायचे होते मात्र तेथील मित्रांनी तू कलेक्टर हो असा हट्ट धरला. मग काय त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. दरम्यानच्या काळात मात्र त्यांनी मुक्त विद्यापीठात पदवीसाठी ऍडमिशन घेतले होते. यूपीएससीची परीक्षा तोंडावर आली असतानाच मुक्त विद्यापीठाची देखील परीक्षा आली.
यामुळे त्यांचे यूपीएससी कडील परीक्षेवरील लक्ष पूर्णपणे विचलित झाले आणि ते पहिल्या प्रयत्नात युपीएससी परीक्षा क्रॅक करू शकले नाही. त्यानंतर त्यांनी पुण्यात राहण्याचा खर्च परवडत नसल्याने पुन्हा एकदा गाव गाठले. गावात येऊन त्यांनी त्यांच्या आईचा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरला. मात्र निवडणुकीत त्यांच्या आईचा पराभव झाला. आणि बस हाच एक टर्निंग पॉईंट ठरला की तेथून घोलप यांच संपूर्ण आयुष्य बदललं.
ज्यावेळी त्यांच्या आईचा ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये पराभव झाला त्याचवेळी त्यांनी जोपर्यंत कलेक्टर बनत नाही तोपर्यंत गावात पाय ठेवणार नाही असा निश्चय केला. आईची निवडणुकीच्या विजयाची मिरवणूक तर निघाली नाही मात्र मी कलेक्टर झाल्यानंतर विजयाची मिरवणूक निघेल अस म्हणतं त्यांनी गाव सोडल. ते परत पुण्यात परतले आणि महाराष्ट्र शासनाच्या एस आय एसी प्रशिक्षण केंद्रात त्यांनी प्रवेश मिळवला.
यानंतर त्यांनी जोमात अभ्यास सुरू केला आणि 2023 मध्ये आपल्या जिद्दीच्या, मेहनतीच्या जोरावर यूपीएससी परीक्षेत तसेच एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. इकडे एमपीएससी आणि यूपीएससी मध्ये एकाच वेळी यश मिळवलं तिकडे त्यांनी केलेल्या निश्चयाप्रमाणे त्यांच्या गावात त्यांच्या विजयाची मिरवणूक निघाली.
निश्चितच या ध्येयवेड्या अधिकाऱ्याने केवळ आर्थिक परिस्थितीवर मात करत विजय मिळवला नाही तर आपल्या शारीरिक आणि मानसिक परिस्थितीवरही मात मिळवत हा विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे हा विजय इतरांच्या विजयापेक्षा अधिक प्रेरणादायी आणि केवळ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे यात शन्काचं नाही.