Success Story : नाशिक जिल्हा हा कांदा व द्राक्ष उत्पादनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. मात्र असे असले तरी येथील शेतकरी बांधव वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून इतरही पिकांची यशस्वी लागवड करत आहेत.
जिल्ह्यातील शेतकरी वेगवेगळ्या प्रयोगासाठी कायम चर्चेत असतात. आता येवला तालुक्यातील खिर्डीसाठी येथील एका तरुण शेतकऱ्याने सिताफळ शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे या अवलिया शेतकऱ्याने उत्पादित केलेले सिताफळ बांगलादेश ला निर्यात होतात.
त्यातून या युवा शेतकऱ्याला चांगली कमाई होत आहे. निश्चितच एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना युवा शेतकऱ्याने केलेला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे. खिर्डी साठी येथील तरुण शेतकरी योगेश सूर्यभान इप्पर यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने फ़ळबाग लागवड केली आहे.
0.70 गुंठा शेतजमीनीत त्यांनी सिताफळ या फळ पिकाची शेती सुरू केली आहे, यासाठी कृषी विभागाच अनमोल सहकार्य त्यांना लाभल आहे. खरं पाहता योगेश यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. मात्र शेतीमध्ये कायमचा आधुनिक प्रयोग करत असल्याने प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची परिसरात ख्याती आहे.
त्यांनी केलेला सिताफळ लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. योगेशने गोल्डन सिताफळाचे एकूण सहाशे झाडे लावले आहेत. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत असून उत्पादीत झालेले सिताफळाचे योग्य पद्धतीने ग्रेडिंग व पॅकिंग करून सदर माल बांगलादेश रवाना केला जातो.
यामुळे योगेश यांनी उत्पादित केलेल्या सीताफळाला चांगला दर मिळतो. शिवाय सीताफळ उत्तम दर्जाचे असल्याने त्याला मागणी अधिक आहे. निश्चितच योगेश रावांनी शेतीमध्ये केलेली ही कामगिरी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारी सिद्ध होणार आहे.
शेतकऱ्यांनी काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल केला आणि फळबाग लागवडीकडे आपला मोर्चा वळवला तर निश्चितच शेतकऱ्यांना शेतीतून चांगली कमाई होणार आहे.