Success Story : पुणेकरांच्या बाबतीत एक म्हण विशेष प्रचलित आहे ती म्हणजे पुणे तिथे काय उणे. ही म्हण प्रचलित होण्याचे कारण असे की पुण्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. पुणेकर प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. येथील शेतकरी (Farmer) देखील आपल्या नवनवीन प्रयोगातून सर्व महाराष्ट्राचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यास सक्षम आहेत.
पुणे जिल्ह्यातील (Pune District) दौंड तालुक्यातील एका शेतकरी पिता-पुत्राने देखील शेतीमध्ये असाच एक प्रयोग केला असून सध्या या शेतकरी पिता पुत्राची संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा रंगली आहे. मित्रांनो या बापलेकाच्या जोडीने शेतीला पूरक व्यवसाय (Agriculture Business) म्हणून चक्क खेकडा शेती (Crab Farming) म्हणजे खेकडा पालन सुरू केल आहे.
आता तुम्ही म्हणत असाल खेकडा पालन कुठे केलं जातं का तर हो खेकडा पालन देखील इतर पशुपालनाप्रमाणेच (Animal Husbandry) केलं जातं. खरे पाहता खेकडा मध्ये असलेले औषधी गुणधर्म पाहता डॉक्टर लोक खेकडा खाण्याचा सल्ला देत असतात. त्यामुळे अलीकडे याची मागणी देखील मोठी वाढली आहे. मात्र असे असले तरी याचा पुरवठा अजूनही बाजारात नगण्यच आहे. हीच बाब हेरून दौंड तालुक्यातील यवत येथील राजेंद्र ननावरे व कुलदीप ननावरे या पिता-पुत्रांनी खेकडा पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी शेतातच खेकडा शेती सुरू केली आहे.
शिवाय बाजाराचा आढावा घेऊन खेकडा शेती सुरू केली असल्याने त्यांना यातून चांगली कमाई होण्याची आशा आहे. ननावरे यांच्या मते, खेकड्याला बाजारात मोठी मागणी आणि चांगला बाजार भाव असतो मात्र त्या तुलनेने अजूनही बाजारात याचा पुरवठा होत नाही. यामुळे त्यांनी खेकडा शेतीचा निर्णय घेतला आहे. खरं पाहता दौंड तालुका ऊस उत्पादनासाठी आणि गुळाच्या उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो.
मात्र, ऊस शेतीमध्ये येत असलेले नवनवीन आव्हाने लक्षात घेता खेकडा शेतीचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी देखील नवीन वाट दाखवणारा सिद्ध होणार आहे. विशेष म्हणजे आता ननावरे पिता-पुत्रांच्या हा शेतीमधला भन्नाट प्रयोग पाहण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी बांधव त्यांच्या बांधावर हजेरी लावत आहेत. ननावरे कुटुंब देखिल त्यांना चांगले मार्गदर्शन देत आहे. निश्चितच शेतीमधील हा जोडव्यवसाय भविष्यामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता देखील यामुळे व्यक्त केली जात आहे.
ननावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेकडा संगोपन सुरू करण्यासाठी त्यांनी शेतात ४० फूट रुंद व ५० फूट लांब व ११ फूट खोल हौद तयार केला असून त्यात वाळूचे खडे, मोठे डबर, चिकणमाती, बारीक वाळू, योग्य प्रमाणात आणि योग्य मांडणीने भर घातली आहे. या खड्ड्यात पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांनी जवळपास एक टन खेकडे सोडले आहेत. खरं पाहता खेकड्यांना त्यांना मानवेल असा अधिवास तयार करणं हे एक आव्हानात्मक काम आहे.
यामुळे खेकडा शेती सुरू करण्याआधी तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घेणे अनिवार्य आहे. ननावरे यांनी अल्प खर्चात खेकडे खरेदी केले असून त्यांच्या आहारात टाकाऊ भाजीपाला, हॉटेलचा कचरा, शिजवलेला भात, चिकन सेंटरमधून कोंबड्यांचे अवशेष इत्यादिचा समावेश केला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ज्यावेळी पारंपारिक गुऱ्हाळे बंद करण्यात आले त्यावेळी या ननावरे कुटुंबांने आधुनिक गुऱ्हाळे तयार करून दौंड तालुक्याला गुऱ्हाळासाठी प्रसिद्ध केले.
आता ननावरे कुटुंबाने केलेला हा खेकडा शेतीचा प्रयोग दौंड तालुक्यात कितपत वाढतो हे तर येणारा काळच सांगेल मात्र शेतीमधला हा प्रयोग निश्चितच कौतुकास्पद आहे. फक्त शेतीवर अवलंबून राहण्याऐवजी शेतीसोबत शेती पूरक व्यवसाय ही काळाची गरज आहे. जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना केवळ शेतीवर विसंबून राहू नका असा सल्ला देत आहेत. अशा परिस्थितीत ननावरे पिता-पुत्रांनी केलेला हा शेतीमधला प्रयोग वाखाणण्याजोगा आणि शेतकरी बांधवांना मार्गदर्शक ठरणारा आहे.