Strawberry Farming : अलीकडे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले जाऊ लागले आहेत. शेतीमध्ये केल्या जाणाऱ्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळू लागले आहे. खरे तर अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट दुष्काळ अशा नानाविध संकटांमुळे शेतकरी देशोधडीला लागले आहेत.
शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकटांमुळे शेतीमधून फारसे उत्पादन मिळत नाहीये. जर समजा शेतकऱ्यांनी या संकटांचा यशस्वी सामना करून चांगले उत्पादन मिळवले तर बाजारात त्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाही ही वास्तविकता आहे.
अशा परिस्थितीत आता बाजारात ज्याची मागणी आहे त्या पिकांची शेती करणे अतिशय आवश्यक आहे. दरम्यान हीच गोष्ट लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील युवा शेतकरी उमेश दत्तात्रय खामकर यांनी शेतीमध्ये नवीन प्रयोग केला आहे.
उमेश खामकर यांनी चक्क पांढऱ्या स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करून दाखवली आहे. वाई तालुक्यातील फुलेनगर येथे उमेश यांची शेती आहे. उमेश यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी पांढऱ्या स्ट्रॉबेरीची शेती सुरू केली.
त्यांनी अर्धा एकर जमिनीत या पांढऱ्या स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी करून दाखवली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये उमेश यांनी वीस गुंठा जमिनीत पांढऱ्या स्ट्रॉबेरीची दहा हजार रोपे लावली.
यातून आता त्यांना उत्पादन मिळू लागले आहे. सध्या सातारा आणि इतर ठिकाणी पांढऱ्या स्ट्रॉबेरीची ते विक्री करत आहेत. विशेष म्हणजे लवकरच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील पांढरी स्ट्रॉबेरी विक्रीसाठी ठेवली जाणार आहे.
विशेष म्हणजे या स्ट्रॉबेरीतून सामान्य स्ट्रॉबेरीपेक्षा सहापट अधिकचे उत्पादन त्यांना मिळत आहे. फ्लोरिडा पर्ल या जातीची पांढरी स्ट्रॉबेरी सर्वप्रथम अमेरिका आणि युकेमध्ये उत्पादित झाली. तेथे या पांढऱ्या स्ट्रॉबेरीला चांगला प्रतिसाद मिळाला.
त्यानंतर मग जगातील इतरही भागात या स्ट्रॉबेरीची लागवड होऊ लागली. आपल्या भारताचा विचार केला असता उमेश यांनी केलेला हा प्रयोग पहिलाच ठरला आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी फ्लोरिडा विद्यापीठाचे राईट विकत घेतले आहेत.
रॉयल्टी राइट्स उमेश यांच्याकडे असल्याने आता भारतात कोणालाही या जातीच्या पांढऱ्या स्ट्रॉबेरीची शेती करायची असेल तर उमेश यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
निश्चितच शेतीमध्ये जर काळाच्या ओघात बदल केला तर चांगले उत्पादन मिळवता येऊ शकते हेच उमेश यांच्या प्रयोगातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.