Soybean Variety For Kharif Season : भारतीय हवामान खात्याने यंदा मान्सून काळात अर्थातच जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने यंदा मान्सूनचे वेळे आधीच आगमन होऊ शकते असे म्हटले आहे. सध्या संपूर्ण देशभर प्रचंड उष्णता जाणवत असून याचा फायदा मान्सूनला होणार आहे.
प्रचंड उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याचे जलद गतीने बाष्पीभवन होत असून यामुळे हवेचा दाब वाढत चालला आहे. सध्या समुद्रावरील हवेचा दाब 850 हेक्टा पास्कल एवढा आहे. यावेळी हा हवेचा दाब 1000 हेक्टर पास्कल वर जाईल त्यावेळी मान्सूनच्या निर्मितीला सुरुवात होणार आहे.
त्यामुळे यंदा मान्सूनचे अंदमानात लवकरच आगमन होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने 21 दिवसांनी मान्सूनचे अंदमानात आगमन होईल आणि मग मान्सूनचे केरळात आगमन होण्याची शक्यता आहे. यंदा वेळेआधीच मान्सूनचे केरळात आगमन होऊ शकते.
असे झाल्यास निश्चितच देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यंदा मान्सूनचे वेळे आधीच आगमन होणार आहे तसेच मान्सून काळात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे आपल्या महाराष्ट्रात यावर्षी सोयाबीन लागवड काहीशी वाढवू शकते असा अंदाज आहे.
अशा परिस्थितीत आज आपण सोयाबीनच्या काही प्रमुख जातींची माहिती जाणून घेणार आहोत. पाऊसमान चांगला राहिल्यास सोयाबीनच्या कोणत्या जातींची पेरणी केली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना चांगले विक्रमी आणि दर्जेदार उत्पादन मिळेल याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत.
सोयाबीनच्या सुधारित जाती
आरवीएसएम 1135 : हा वाण राजमाता सिंधिया कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी अलीकडेच विकसित केलेला एक लोकप्रिय वाण आहे. हा वाण उच्च उत्पन्न देण्यास सक्षम आहे आणि येलो मोझॅक व्हायरस रोगास प्रतिकारक असल्याचे आढळून आले आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि बुंदेलखंड प्रदेशासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे.
सामान्य जातीपेक्षा 18 ते 28% अधिकचे उत्पादन देण्यास ही जात सक्षम आहे. या जातीपासून हेक्टरी 28 ते 30 क्विंटल एवढे उत्पादन मिळत असल्याचे म्हटले जात आहे. या जातीचा पीकपरिपक्व कालावधी 94 ते 96 दिवस एवढा आहे.
जेएस 2172 : यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पाऊसमान चांगला राहील्यास या जातीची लागवड करण्याचा सल्ला दिला जातो. सोयाबीनची ही प्रमुख जात असून यापासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते.
या जातीपासून सरासरी 25 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. या वाणातून काही शेतकऱ्यांनी 35 क्विंटल पर्यंतचे उत्पादन देखील मिळवले आहे.
आर.वी.एस. 2001-4 : या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 25 ते 28 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. या जातीचा पीक परीपक्व कालावधी हा 92 ते 93 दिवस एवढा आहे. राजमाता सिंधिया कृषी विद्यापीठाने विकसित केलेला हा वाण शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. याची मध्यप्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे.