Soybean Tur Market Rate : सोयाबीन आणि तूर हे खरीप हंगामात उत्पादित होणारे मुख्य पीक आहे. या पिकांची संपूर्ण राज्यभर लागवड केली जाते. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात ही दोन्ही पिके मोठ्या प्रमाणात उत्पादित होतात. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकांवर अवलंबून आहे.
मात्र या चालू हंगामात ही दोन्ही पिके शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरत आहेत. कारण की, सोयाबीन आणि तुरीला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाहीये.
एकतर आधीच मान्सून काळात अपेक्षित असा पाऊस झाला नसल्याने सोयाबीन आणि तुरीच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. उत्पादनात घट आली असल्याने किमान बाजारभाव तरी चांगला मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.
मात्र असे काही झाले नाही सोयाबीन आणि तुरीच्या बाजारभावात असलेली नरमाई अजूनही कायमच आहे. खरे तर मध्यंतरी तुरीचे बाजार भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते.
आता मात्र हेच दर 7000 पर्यंत खाली आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. उसनवारीने पैसे घेऊन शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी केलेली होती.
मात्र आता मालाला बाजारात चांगला दर मिळत नसल्याने उसनवारी फेडायचे कसे हाच मोठा सवाल शेतकऱ्यांपुढे आहे. दुसरीकडे सोयाबीनच्या बाबतीतही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
सोयाबीनला देखील बाजारात खूपच कमी दर मिळत असून सद्यस्थितीला बाजार समित्यांमध्ये चांगल्या दर्जाच्या मालालाही पाच हजारापेक्षा कमीच भाव मिळत आहे.
यामुळे सोयाबीन उत्पादकही यंदा मोठ्या अडचणीत आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज वाशिम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल ते ४७०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
तसेच तुरीला या बाजारात 6500 ते 7000 रुपये प्रति क्विंटल असा दर नमूद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मते याच बाजारभावात मालाची विक्री केली तर पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघणार नाही. अशा परिस्थितीत संसाराचा गाडा कसा चालवायचा हा सवाल आहे.
त्यामुळे शासनाने काहीतरी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत आणि तुरीला किमान दहा हजार रुपये आणि सोयाबीनला किमान 8000 रुपयाचा भाव दिला गेला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे.