Soybean Subsidy : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. शाश्वत उत्पन्न देणार हे पीक आहे. मात्र अनेकदा सोयाबीनला कवडीमोल दर मिळतो यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढणे मुश्किल होते. 2016-17 मध्ये देखील अशी परिस्थिती उद्भवली होती.
सोयाबीनला अतिशय कमी दर मिळत होता. शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा भ्रूदंड यामुळे बसत होता. अशा परिस्थितीत तत्कालीन भाजपा सरकारने प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान सोयाबीन उत्पादकांना देण्याची घोषणा केली.
राज्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळालं. मात्र, अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले. यामध्ये हिंगोली येथील संत नामदेव खाजगी बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होता. या बाजारात सोयाबीन विक्री केलेल्या जवळपास 3442 शेतकरी बांधवांना सोयाबीनचे अनुदान मिळालेले नव्हते.
याशिवाय महाराष्ट्रातील जवळपास 6414 शेतकऱ्यांना हे सोयाबीन अनुदान मिळालं नव्हतं. मात्र आता या शेतकऱ्यांना अनुदान दिल जाणार आहे. म्हणजेच तब्बल पाच वर्षांनी या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. खरं पाहता या अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी बाजार समिती प्रशासनाकडून तसेच शेतकरी संघटनांकडून वारंवार मागणी केली जात होते.
अखेर या मागणीला यश आले असून संत नामदेव खाजगी बाजार समितीमध्ये 2016 17 मध्ये सोयाबीन विक्री करणाऱ्या 3442 शेतकऱ्यांना 78 लाख 9 हजार 762 रुपये तसेच राज्यातील इतर 6414 शेतकऱ्यांना एक कोटी 61 लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे.
सेनगाव येथील संत नामदेव बाजार समितीसह राज्यातील महाराष्ट्र ऑईल परभणी, नाना मुंदडा कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव, आयटीसी नागपूर शाखा परभणी या बाजार समितीमध्ये 2016-17 मध्ये सोयाबीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ खाजगी बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्री केले म्हणून अनुदानापासून वंचित करण्यात आले होते.
मात्र आता राज्यातील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना सोयाबीन अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.