Soybean Snail Control : जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत पावसाने दडी मारली होती. मात्र आता पाऊस सक्रिय झाला आहे. अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. काही भागात पहिला पाऊस झाला आहे. मात्र पहिला पाऊस पडल्यानंतर कापूस, सोयाबीन यांसारख्या पिकात शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी या कीटकांमुळे सोयाबीन आणि कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. प्रामुख्याने सोयाबीन पिकाची मोठी क्षती झाली. अनेकांना अपेक्षित असे उत्पादन मिळवता आले नाही. यामुळे या हंगामात या कीटकांमुळे जास्तीचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना आतापासूनच प्रयत्न करावे लागणार आहेत.
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पहिला पाऊस पडला की गोगलगाय सक्रिय होते. हे कीटक जून ते सप्टेंबर या काळात सक्रिय असतात आणि रोपाअवस्थेत असलेल्या पिकांचे नुकसान करतात. यामुळे यावर नियंत्रण मिळवणे जरुरीचे आहे. अशा परिस्थितीत आज आपण या कीटकावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
असं मिळवता येणार नियंत्रण !
मागील वर्षीच्या गोगलगाय प्रादुर्भावग्रस्त भागांमध्ये यंदाही या कीटकाचा प्रादुर्भाव राहण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रादुर्भावग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी शेताच्या बांधाच्या जवळ दोन्ही बाजूने १ ते २ फुटाचे चर काढावेत असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे. बांधाच्या जवळ जर असे जर काढले तर शंकी गोगलगाय या चरितच हटकून जाईल आणि शेतात येणार नाही.
यासोबतच शेताच्या बांधापासून आत ८ किलो प्रती एकर याप्रमाणे तंबाखू भुकटीचा, कोरड्या राखेचा अथवा चुन्याचा १० सेंमी रुंदीचा पट्टा टाकावा असे आवाहन कृषी तज्ञांनी केले आहे. असे केल्यास गोगलगाय शेतात येणार नाही. यामुळे या कीटकांचा प्रादुर्भाव कमी केला जाऊ शकतो असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच, या कीटकाचा प्रादुर्भाव फळबागांमध्ये देखील पाहायला मिळाला आहे. यामुळे फळझाडाच्या खोडास १ किलो मोरचूद अधिक १ किलो चुना १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेली १० टक्के बोर्डोपेस्ट लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ही पेस्ट लावली तर गोगलगाय झाडावर चालणार नाही आणि यामुळे पिकाचे संरक्षण सुनिश्चित होईल असा दावा तज्ञांनी केला आहे.
तसेच अंड्याच्या टरफलाचा चुरा, कोरडी राख, तांब्याची पट्टी अथवा जाळी, बोरिक पावडर चा वापर गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी करता येईल असे कृषी तज्ञांनी नमूद केले आहे.
तसेच शेतातील शंकी गोगलगाय वेचून त्या नष्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कृषी तज्ञांच्या मते, एकरी ८ किलो निंबोळी पावडर, एकरी २० किलो निंबोळी पेंड, ५ टक्के निंबोळी अर्क या सेंद्रिय कीटकनाशकाचा वापर बांधावर केल्यास या कीटकापासून पीक संरक्षित केले जाऊ शकते.