Soybean Rate : गेल्या दोन-अडीच वर्षांपासून नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरत आहे. घटत चाललेली उत्पादकता आणि बाजारात मिळणारा कवडीमोल भाव यामुळे हे पीक परवडत नसल्याची वास्तविकता आहे. मात्र असे असेल तरी आजही महाराष्ट्रात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र फारच उल्लेखनीय आहे.
गेल्यावर्षी कमी भाव असतानाही यंदा खरीपात सोयाबीन ची सर्वाधिक लागवड झाली आहे. सोयाबीन लागवडी खालील क्षेत्र आपल्या महाराष्ट्रात विशेष उल्लेखनीय असून देशातील एकूण उत्पादनापैकी जवळपास 40% उत्पादन हे आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते.
45% उत्पादन असणारे मध्य प्रदेश हे उत्पादनाच्या बाबतीत देशात एक नंबरवर आहे. तसेच आपल्या राज्याचा दुसरा नंबर लागतो. यावरून महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकावर अर्थकारण अवलंबून असल्याचे स्पष्ट होते.
सोयाबीनला बाजारात अपेक्षित असा दर मिळत नसल्याने भारतीय किसान संघाने सोयाबीनला 6,945 रुपये प्रति क्विंटल एवढा दर दिला जावा अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाकडे केली आहे.
सोयाबीनची सरासरी उत्पादकता हेक्टरी १४.५६ क्विंटल तर सरासरी उत्पादन खर्च प्रतिक्विंटल ६,०३९ आहे. अशा परिस्थितीत सोयाबीनला किमान 6945 रुपये प्रति क्विंटल एवढा दर दिला गेला पाहिजे अशी मागणी संघटनेने केली आहे.
गेल्यावर्षी उत्पादित झालेल्या सोयाबीनचे दर 4500 रुपये प्रति क्विंटल च्या वर गेलेच नाहीत. फारच बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांचे सोयाबीन 5000 रुपये प्रति क्विंटल किंवा त्याहून अधिक दरात विकले गेले.
अशा परिस्थितीत, सोयाबीन उत्पादक आर्थिक संकटात आले आहेत. यामुळे सोयाबीनला किमान 6945 रुपयाचा भाव मिळायला हवा अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, जर शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर लाभकारी किंमत मिळत नसेल तर राज्य सरकारने भावांतर पद्धतीने किंवा बोनसच्या माध्यमातून फरक देण्याची व्यवस्था करावी, या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना किसान संघाकडून पाठविण्यात आले आहे.
यामुळे खरंच सरकार करून या संदर्भात काही सकारात्मक निर्णय होतो का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. येत्या काही दिवसांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत.
यामुळे राज्यातील शिंदे सरकार या संदर्भात नक्कीच विचार करणार आहे. पण खरंच सोयाबीनला असा भाव दिला जाईल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.