Soybean Rate News : सोयाबीन हे एक प्रमुख तेलबिया पीक. या पिकाची खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. खरीप हंगामात राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनची लागवड होते. यावर्षी मात्र सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीमुळे सोयाबीन समवेतच कांदा आणि कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे शेतकरी देशोधडीला लागले आहेत. अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादकांना अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही.
दुसरीकडे उत्पादित झालेल्या मालालाही बाजारात अपेक्षित दर मिळत नाहीये. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
खरेतर, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला महाराष्ट्रात शेतकऱ्यांची नाराजी जड भरली होती. दरम्यान, सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी हे केंद्रस्थानी होते. शेतकऱ्यांची नाराजी महायुती सरकारला महागात पडली होती. याच साऱ्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आपल्या वचननाम्यातून शेतकऱ्यांना आश्वासने देतांना दिसत आहेत.
या अशा वातावरणात भाजपाचे नेते आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोयाबीनच्या बाजारभावाबद्दल शेतकऱ्यांना मोठे आश्वासन दिले आहे.
परंडा येथील महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत असताना पाशा पटेल म्हणाले की, सोयाबीनला भाव कमी आहे म्हणून शेतकऱ्यांच्या मनात आमच्याबद्दल राग आहे.
सोयाबीनचे भाव कमी असल्यामुळे मी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. यामुळे पुढील 4 दिवसांमध्ये तुम्हाला हवा तसा भाव मिळणार आहे. नक्कीच जर येत्या काही दिवसांनी सोयाबीनचे दर वाढले तर याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
तथापि आगामी काळात सोयाबीनला काय भाव मिळतो हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे. जर सोयाबीनला बाजारात अपेक्षित दर मिळाला नाही तर याचा फटका नेमका कोणाला बसणार हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरेल.