Soybean Rate : सोयाबीन, कापूस, तूर आणि मका ही खरीप हंगामात उत्पादित होणारी महत्त्वाची पिके आहेत. यापैकी सोयाबीन आणि कापूस या पिकांवर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. या दोन्ही पिकांची मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातही या पिकाची कमी अधिक प्रमाणात शेती होते.
गेल्या दोन वर्षांपासून मात्र सोयाबीन आणि कापसाचे पीक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. याचे कारण म्हणजे उत्पादनात होणारी घट आणि घसरत चाललेला बाजार भाव. गेल्या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाला अपेक्षित भाव मिळाला नाही.
गेल्या वर्षी मानसून मध्ये दुष्काळाचे सावट असल्याने उत्पादनात देखील घट आली होती. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. उत्पादनात घट आणि मालाला मिळालेला कमी दर यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी झाली.
परिस्थिती एवढी बिकट होती की शासनाला गेल्यावर्षीच्या कापूस आणि सोयाबीन पिकासाठी अनुदानाची घोषणा करावी लागली. विशेष म्हणजे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना येत्या काही दिवसांनी अनुदानाची रक्कमही मिळणार आहे.
अशातच सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे यंदा कापूस पीक लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. यंदा कापूस लागवडीखालील क्षेत्र अकरा टक्क्यांनी कमी झाले आहे.
पण, कापूस पिकासाठी सध्याचे हवामान पोषक आहे. मराठवाडा आणि विदर्भ विभागात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून यामुळे कापसाचे पीक चांगले बहरले आहे. यामुळे उत्पादनात वाढ होईल अशी शक्यता आहे.
असे घडले असे यंदा कापसाचे बाजार भाव गेल्या वर्षी प्रमाणेचं स्थिर राहणार असे म्हटले जात आहे. मात्र असे असले तरी कापसाचा हंगाम विजयादशमीपासून सुरू होणार असून तेव्हाच कापसाच्या उत्पादनाचा योग्य तो अंदाज बांधता येणार आहे.
दुसरीकडे सोयाबीन पीक लागवडी खालील क्षेत्र मात्र यंदाही फारसे कमी झालेले नाही. उलटपक्षी यंदा जागतिक सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र एक टक्क्यांनी वाढले आहे. पण देशातील सध्याचे हवामान सोयाबीन पिकासाठी पोषक नसल्याचे म्हटले जात आहे.
जुलैमध्ये आणि ऑगस्ट च्या सुरुवातीला प्रमुख सोयाबीन उत्पादक भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती आणि यामुळे सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट येणार असे बोलले जात आहे.
असे झाले तर यावेळी सोयाबीन बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे. तथापि, पुढील दोन महिने सोयाबीन आणि कापूस पिकाच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यात हवामान कसे राहणार यावरच कापूस आणि सोयाबीनचे बाजार भाव अवलंबून असतील.