Soybean Rate Maharashtra : सोयाबीन हे महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक. याची लागवड राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये केली जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनच्या पेक्षा शेतकऱ्यांना परवडत नाहीये. या चालू हंगामात देखील सोयाबीनला शेतकऱ्यांच्या अपेक्षाप्रमाणे भाव मिळत नाहीये.
राज्यातील अनेक ठिकाणी सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असून यामुळे पिकासाठी आलेला खर्च कसा भरून काढायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभा झाला आहे. सोयाबीनचे भाव सातत्याने घसरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा पाहायला मिळत आहे.
बाजारातील अभ्यासाकांनी सांगितल्याप्रमाणे अमेरिका, ब्राझील यांसारख्या प्रमुख सोयाबीन उत्पादक देशांत सोयाबीनचे यंदा चांगले उत्पादन झाले आहे. हेच कारण आहे की सध्या महाराष्ट्रासहित भारतात सोयाबीनचे दर दबावात आहेत.
महत्त्वाचे म्हणजे आगामी काळातही सोयाबीनचे दर वाढतील असे सध्यातरी दिसत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. खुल्या बाजारात पिवळे सोने म्हणून ओळख असणाऱ्या सोयाबीनचे दर सातत्याने कमी होत आहेत. कालच्या लिलावात सुद्धा सोयाबीनच्या दरात नरमाई पाहायला मिळाली.
सध्या प्रक्रिया प्लांटसकडून मागणी कमी झाल्याने बाजारात सोयाबीनचा सरासरी भाव प्रतिक्विंटल ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान आहे. दुसरीकडे सरकारची हमीभावाने खरेदी खूपच धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे खुल्या बाजाराला याचा आधार मिळत नसल्याची वास्तविकता आहे.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात देखील मोठ्या प्रमाणात नाराजी दिसते. जागतिक पातळीवर देखील सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात घसरलेले आहेत आणि यामुळे आगामी काळातही देशांतर्गत बाजारांमध्ये सोयाबीनचे दर असेच दबावात राहतील असे मत आता सर्वांकडून व्यक्त होत आहे.
सोयाबीनला यंदा मिळणारा भाव हा मागील पाच वर्षांतील नीचांकी आहे. त्यामुळे २० डिसेंबरला वायदेबंदीची मुदत संपल्यानंतर सरकारने वायदे सुरू करावेत, अशी मागणी शेतकरी, व्यापारी आणि आयात-निर्यातदार करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २०२०-२१ मध्ये सोयाबीनला ९ हजार २३५ रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता.
त्यानंतर मात्र सोयाबीनचे बाजार भाव दरवर्षी कमीच राहिलेत. २०२१-२२ मध्ये ६ हजार ७१९ रुपये प्रति क्विंटल, २०२२ २३ मध्ये ५ हजार १६५५ रुपये प्रति क्विंटल, तर यंदा अर्थात २०२३-२४ मध्ये सोयाबीनला अवघा ४ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा भाव मिळत आहे. एकीकडे सोयाबीन पिकासाठी चा उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे तर दुसरीकडे सोयाबीनचे दर सतत कमीच होत आहेत.
यामुळे आता शेतकऱ्यांनी काय करावे, पिकासाठी आलेला खर्च कसा भरून काढावा आणि आपल्या संसाराचा गाडा कसा हाकावा हा मोठा प्रश्न आहे. तज्ञ सांगतात की, जगातील प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्रांमध्ये सोयाबीन उत्पादनात वाढ झाली आहे. अशात सोयाबीनच्या भाववाढीची शक्यता कमीच आहे.
तथापि, भाव यापेक्षा कमी होण्याचीही शक्यता नाही. मात्र, शासकीय खरेदी मोठ्या प्रमाणात वाढ झाली, तर सोयाबीनला फायदा होऊ शकतो. यामुळे आता सरकार सोयाबीनचे पडलेले भाव अन शेतकऱ्यांची ही बिकट परिस्थिती पाहता आगामी काळात काही ठोस निर्णय घेणार का हे पाहण्यासारखे ठरेल.