Soybean Rate : गेल्या दोन-तीन वर्षांपासून सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडत नाहीये. सोयाबीन हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची शेती राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये होते. यंदा मात्र सोयाबीनच्या पिकाला मोठा फटका बसलाय. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात खराब झाले असून यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही.
तसेच सोयाबीनचा दर्जा देखील खालावला आहे. सोयाबीनची प्रत खूपच खालावली असल्याने आणि शेतकऱ्यांना पैशांची निकड असल्याने सध्या बाजारात सोयाबीनला फारच कमी दर दिला जातोय. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून जाणून-बुजून कमी दर दिला जात असल्याची तक्रार यावेळी केली आहे.
पैशांची निकड असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करावी लागत आहे आणि याचाच फायदा उचलून काही व्यापाऱ्यांकडून जाणून-बुजून दर पाडले जात आहेत. त्यामुळे जर शेतकऱ्यांना पैशांची गरज असेल तर शेतकऱ्यांनी सोयाबीन थेट बाजारात विक्री करणे ऐवजी ते सोयाबीन तारण ठेवून त्यावर कर्ज घ्यावे असा सल्ला जाणकारांनी दिला आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तारण योजनेचा लाभ घेऊन कर्ज काढावे आणि आपल्या पैशांची गरज भागवावी तसेच जेव्हा सोयाबीनला चांगला दर मिळेल तेव्हा त्याची विक्री करावी असे आवाहन यावेळी कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आज आपण शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या शेतमाल तारण योजनेची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
काय आहे शेतमाल तारण योजना ?
शासनाकडून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. कृषी पणन मंडळ १९९०-९१ पासून राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना राबवीत आहे.
सदर योजनेंतर्गत बाजार समितीच्या गोदामात तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्केपर्यंतची रक्कम कर्ज स्वरूपात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते. या योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम ही सहा महिने कालावधीसाठी दिली जाते.
शेतमाल तारण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा टक्के व्याज दराने कर्ज देण्यात येते. या योजनेतून सहा महिन्यांच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना ३ टक्के व्याजाची सवलत सुद्धा मिळत असते. यामुळे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून यावेळी करण्यात आले आहे.