Soybean News : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सोयाबीन हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाची महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या विभागात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या पिकाला पिवळं सोनं म्हणून ओळखल जात.
देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 40 टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात घेतले जाते. याशिवाय, मध्यप्रदेश मध्ये 45% उत्पादन घेतले जाते. मध्यप्रदेश राज्याचा सोयाबीन उत्पादनात पहिला क्रमांक आणि महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो.
सोयाबीनची खरीप हंगामात लागवड केली जाते. जून महिन्यात साधारणता सोयाबीनची पेरणी होते आणि सप्टेंबर अखेरीस सोयाबीनची हार्वेस्टिंग केली जाते. काही ठिकाणी सप्टेंबरच्या पहिल्याच पंधरवड्यात सोयाबीन बाजारात येत असतो.
त्यानुसार राज्यातील काही भागांमध्ये नवीन हंगामातील सोयाबीन बाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी अर्थातच 12 सप्टेंबरला विदर्भातील वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या हंगामातील सोयाबीनची आवक झाली होती.
महत्त्वाचे म्हणजे नव्या हंगामातील मुहूर्ताच्या सोयाबीनला या बाजारात 5 हजार 555 प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे. वाशिम मधील वाळकी येथील शेतकरी विशाल नारायण नंदापुरे यांनी नवीन हंगामातील सोयाबीन हार्वेस्टिंग नंतर विक्रीसाठी आणला होता.
यावेळी नंदापुरे यांच्या नव्या हंगामातील सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक भाव मिळाला. महत्त्वाचे म्हणजे नंदापुरे यांचा बाजार समिती प्रशासनाच्या माध्यमातून सत्कारही करण्यात आला.
खरंतर दरवर्षी सप्टेंबर मध्ये नव्या हंगामातील सोयाबीनची आवक सुरू होते. मात्र नव्या मालाची आवक ऑक्टोबरमध्येच वाढत असते. नवरात्र उत्सवानंतर अर्थातच विजयादशमीनंतर नव्या मालाची आवक सर्वाधिक होते. यंदाही विजयादशमीनंतर सोयाबीनची आवक वाढणार आहे.
तत्पूर्वी मात्र ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची लवकर पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांचा नवीन सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येत आहे. वाशिम येथील प्रयोगशील शेतकरी नंदापुरे यांचा देखील नव्या हंगामातील सोयाबीन वाशिमच्या बाजारात 12 सप्टेंबरला विक्रीसाठी आला होता.
या मालाला 5 हजार 555 प्रति क्विंटल असा दरही मिळाला. मात्र आता आगामी काळात सोयाबीनचे दर कसे राहणार ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला अपेक्षित भाव मिळाला नव्हता मात्र यंदा सोयाबीनला चांगला दर मिळेल असे वाटत आहे.
तथापि पावसाच्या लहरीपणाचा याहीवर्षी सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे अन याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. पण जर सोयाबीनला चांगला दर मिळाला तर नक्कीच शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार आहे.