Soybean Market Price : राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीन या पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी होते. हे पिक आपल्याकडे खरीप हंगामात पिकवले जाते. उन्हाळ्यात देखील याची पेरणी होते मात्र उन्हाळ्यात प्रामुख्याने बीजोत्पादनासाठी याची पेरणी करतात.
यामुळे उन्हाळ्यात सोयाबीन पेरणीखालील क्षेत्र खूपच कमी आहे. म्हणजेच, सोयाबीनची व्यावसायिक शेती ही फक्त खरीप हंगामातच केली जाते. गेल्या खरीप हंगामात देखील महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी झाली होती.
गेल्या वर्षी कमी पाऊस होता, पण ज्या ठिकाणी पाऊस झाला तिथे सोयाबीनची पेरणी झाली होती. तथापि, पेरणीनंतर हवामान बदलाचा सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला.
यामुळे याच्या उत्पादनात घट आली. कमी पाऊस, पांढरी माशी, येलो मोजॅक सारख्या रोगामुळे सोयाबीन पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट नमूद करण्यात आली आहे. पण शेतकऱ्यांना सोयाबीनला बरा भाव मिळेल आणि हे पिवळं सोनं यंदा तारेल अशी आशा होती.
सोयाबीन पिकातून निदान पिकासाठी आलेला खर्च भरून निघेल आणि संसारासाठी दोन पैसे शिल्लक राहतील अशी भोळी-भाबडी आशा शेतकऱ्यांची होती. पण, या चालू हंगामात सोयाबीनला शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे भाव मिळाला नाही.
अगदी हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनचा बाजार दबावात पाहायला मिळाला. काही ठिकाणी तर मालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला आहे. अशा परिस्थितीत अनेकांना या पिकाचा उत्पादन खर्च देखील भरून काढता आलेला नाही.
आता तर हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कमी बाजार भावातच आपला माल विकून टाकला आहे. तथापि काही शेतकऱ्यांकडे अजूनही थोड्याफार प्रमाणात सोयाबीन शिल्लक आहे.
यामुळे अनेक जण हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना सोयाबीनचे भाव वाढतील का असा प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान, याच संदर्भात बाजार अभ्यासाकांनी महत्वाची माहिती दिली आहे. खरे तर सोयाबीन, सोयापेंड आणि सोया तेलाच्या वायद्यांमधील चढ-उतार अजूनही कायमच आहेत.
याचा परिणाम म्हणून देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्स मध्ये सोयाबीनचे भावही कमी झाले आहेत. बाजार समित्यांमधील भाव पातळी तर गेल्या अनेक दिवसांपासून दबावात आहे. सध्या बाजारात सोयाबीनला चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळतोय.
बाजारातील आवक मात्र टिकून आहे. दरम्यान, सध्याची परिस्थिती पाहता पुढचे काही आठवडे तरी सोयाबीनच्या भावात असेच चढ-उतार राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी दिला आहे.