Soybean Market Price : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पिक आहे. या पिकाची राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. पश्चिम महाराष्ट्रात देखील या पिकाची लागवड पाहायला मिळते. मात्र हे प्रमुख तेलबिया पिक सध्या शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
याचे कारण म्हणजे गेल्या हंगामात उत्पादित झालेल्या सोयाबीनला बाजारात खूपच कवडीमोल दर मिळाला आहे. सोयाबीनचे दर सध्या चार वर्षांच्या निचांकी पातळीवर पोहोचले आहेत. गेल्या दहा महिन्यांपासून सोयाबीनचे दर दबावात आहेत.
पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पिकाला हमीभावापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघत नसल्याची वास्तविकता आहे.
सध्या राज्यातील अनेक भागांमधील सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेत आहे. काही भागात या चालू महिन्याच्या अखेरीस म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत येणार आहेत. फुलोरा अवस्थेत आल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी सोयाबीन बाजारात येणार आहे.
सप्टेंबरच्या अखेरीस राज्यातील काही भागांमध्ये सोयाबीनचे पीक पूर्णपणे हार्वेस्टिंग साठी तयार होण्याची शक्यता आहे. पण, काही ठिकाणी सोयाबीन ऑक्टोबर मध्ये बाजारात येते. विजयादशमीपासून सोयाबीनचा नवीन हंगाम खऱ्या अर्थाने सुरू होतो.
त्यापुढे मग हळूहळू सोयाबीनची आवक वाढत जाते. यामुळे गेल्या दहा महिन्यांपासून दबावात असणारे सोयाबीन पुढील हंगामात तरी शेतकऱ्यांना तारणार का? हा मोठा प्रश्न आहे. खरंतर सोयाबीनचे बाजार भाव हे वेगवेगळ्या घटकांवर आधारित असतात.
जागतिक बाजारातील सोयापेंड, सोयाबीनचे भाव, जागतिक सोयाबीन उत्पादन, देशांतर्गत सोयाबीन उत्पादन, मागणी आणि पुरवठा, सोयातेलचे भाव अशा विविध घटकांवर याचे भाव अवलंबून असतात.
अमेरिका आणि ब्राझील यांसारख्या प्रमुख सोयाबीन उत्पादक देशांमधील सोयाबीनचे उत्पादन देखील सोयाबीनचे भाव ठरवत असते. यामुळे यंदा अमेरिकेत सोयाबीनचे उत्पादन कसे राहणार याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. तसेच अमेरिकेच्या सोयाबीन उत्पादनाचा अंदाज कसा राहतो हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.
एकंदरीत आगामी काळात सोयाबीनला काय भाव मिळणार हे वेगवेगळ्या घटकांवर आधारित राहणार आहे. यामुळे आगामी हंगामात सोयाबीनला काय भाव मिळणार हे जाणून घेण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.