Soybean Market Price : सोयाबीन हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. हे तेलबिया पीक राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये उत्पादित होते. देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी आपल्या महाराष्ट्राचा 40 टक्के एवढा वाटा आहे. तसेच मध्य प्रदेश राज्याचा 45 टक्के एवढा वाटा आहे.
मात्र मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात सध्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय. यामुळे पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नाहीये. विशेष म्हणजे ही परिस्थिती फक्त आत्ताच तयार झाली असे नाही तर गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनचा बाजार मंदीत आहे.
यामुळे अनेक सोयाबीन उत्पादक कर्जबाजारी झाले आहेत. यंदाच्या हंगामात सोयाबीनला केंद्रातील सरकारने 4892 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे. प्रत्यक्षात मात्र एमपी च्या बाजारांमध्ये 4150 आणि महाराष्ट्रातील बाजारांमध्ये 4185 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय.
यामुळे शेतकरी बेजार झालेले आहेत. शासनाच्या काही धोरणात्मक निर्णयाचा सोयाबीन बाजारभावावर परिणाम होत आहे. सध्या देशात कच्चं पाम, सोयाबीन, सूर्यफुल तेलाच्या आयातीवर ५.५ टक्के आणि रिफाईन्ड तेलावर १३.७५ टक्के आयात शुल्क लागू आहे.
शेती प्रश्नांच्या जाणकार लोकांनी आणि प्रक्रिया उद्योगातील तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे, सध्या खाद्यतेलाच्या आयातीवर फारच कमी शुल्क आकारले जात असल्याने देशात खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आवक होत असून यामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाहीये.
म्हणून खाद्यतेल आयात शुल्कात वाढ झाली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. भारतात गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेल आयातीचा ओघ सुरूच आहे. परिणामी भुईमूग, सोयाबीन सारख्या तेलबियांना बाजारात फारसा दर मिळत नाहीये.
पण कृषी मंत्रालयाने खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करण्याची सूचना दिली आहे. तथापि, आयात शुल्कात किती वाढ झाली पाहिजे यासंदर्भात कृषी मंत्रालयाकडून काहीच सांगितले गेलेले नाहीये.
कृषी मंत्रालयाने फक्त आयात खाद्यतेलाच्या किंमती देशांतर्गत तेलबिया पिकांच्या प्रक्रिया केलेल्या खाद्यतेलाच्या किंमतीपेक्षा अधिक असाव्यात अशा सूचना यावेळी दिलेल्या आहेत.
मात्र, इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे याबाबतचा निर्णय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीमध्येच घेतला जाणार आहे. यामुळे केंद्रातील सरकार कृषी मंत्रालयाच्या सूचनेनुसार खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
जर खाद्यतेल आयात शुल्कात वाढ झाली तर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना अन तेलबिया प्रक्रिया उद्योगाला यामुळे दिलासा मिळणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात सोयाबीन, भुईमूग यांसारख्या पिकांचे दर वाढतील अशी आशा आहे.