Soybean Farming : सोयाबीन हे महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे कॅश क्रॉप म्हणजेच नगदी पिक. याची लागवड राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये होते. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे.
पिकातून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही आणि दुसरीकडे उत्पादित झालेल्या मालाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही यामुळे शेतकरी राजा दुहेरी संकटात सापडला आहे. गेल्या वर्षी तर सोयाबीन उत्पादकांची परिस्थिती एवढी बिकट बनली होती की शासनाला पुढाकार घेऊन शेतकऱ्यांसाठी अनुदानाची घोषणा करावी लागली होती.
गतवर्षी उत्पादित झालेल्या सोयाबीन पिकाला अपेक्षित दर मिळाला नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान देण्यात आले आहे. दरम्यान यावर्षी उत्पादित झालेल्या सोयाबीनला तरी बाजारात चांगला भाव मिळणार अशी आशा भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांना होती. पण प्रत्यक्षात मात्र बाजारात सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नाही.
विजयादशमीपासून महाराष्ट्रातील अनेक बाजारांमध्ये सोयाबीन आवक वाढली असून बाजारांमध्ये सोयाबीनला फारच कवडीमोल दर मिळतोय आणि यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दरम्यान सोयाबीन बाजार भाव बाबत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि भाजपा नेते पाशा पटेल यांनी एक मोठी माहिती दिली आहे.
सोयाबीनला भाव कमी आहे म्हणून, तुमच्या मनात आमच्याबद्दल राग आहे. पण, भाव कमी झाला म्हणून मी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना नुकताच भेटलो आहे. तसेच, येत्या 4 दिवसात तुम्हाला सोयाबीनला पाहिजे तसा भाव मिळेल असं वक्तव्य भाजप नेते आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलंय.
यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. परांडा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेला पाशा पटेल यांनी देखील हजेरी लावली. यावेळी बोलताना पाशा पटेल यांनी आपण सोयाबीन बाजारभावाबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली असून येत्या चार दिवसात सोयाबीनचे दर वाढतील अशी मोठी घोषणा केली आहे.
त्यांच्या या घोषणेमुळं विदर्भ, मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तथापि येत्या काही दिवसांनी सोयाबीनचे दर वाढणार का, दरवाढीसाठी केंद्रातील सरकार नेमका काय निर्णय घेणार? या साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या ठरणार आहेत.