Soybean Farming : दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोयाबीनला शेतकरी बांधव पिवळं सोनं म्हणून ओळखतात. हे पिवळं सोन अर्थातच येलो गोल्ड राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे.
सोयाबीनची राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागात मोठ्या प्रमाणात लागवड होते. याशिवाय हे पीक पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात उत्पादित होते. गेल्या वर्षी कमी पाऊस झालेला होता तरीही अनेकांनी सोयाबीनची पेरणी केली होती.
यंदा तर जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे यंदा सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र काहीसे वाढणार असे बोलले जात आहे.
तथापि, जर सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातींची लागवड करणे आवश्यक राहणार आहे. याशिवाय, सोयाबीन पिकात योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात युरियाचा वापर करणे देखील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
अशा परिस्थितीत आज आपण सोयाबीनच्या कोणत्या सुधारित जातींची शेतकरी बांधवांनी लागवड केली पाहिजे आणि पिकात युरियाचा वापर कधी आणि किती प्रमाणात केला पाहिजे याविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सोयाबीनचा कोणत्या जातींची लागवड कराल
शेतकरी बांधव केडीएस 992 म्हणजे फुले दुर्वा, सोयाबीन गोल्ड 3344, केडिएस 726 म्हणजेच फुले संगम, फुले किमया म्हणजेच केडीएस 753, जें एस 335, MAUS 612, MAUS 162 या सोयाबीनच्या सुधारित जातींची लागवड करू शकतात.
या जातीपासून शेतकऱ्यांना नक्कीच चांगले उत्पादन मिळू शकणार आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या सर्व जमिनीवर एकाच वाणाची लागवड करण्याऐवजी दोन ते तीन वेगवेगळ्या जातींची पेरणी केली पाहिजे असा सल्ला देण्यात आला आहे.
युरियाचा वापर कधी आणि किती करावा
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करताना हेक्टरी 12 ते 15 किलो युरिया वापरला पाहिजे. यानंतर झाडे वाढू लागल्यावर 25 ते 30 किलो युरियाचा वापर करावा आणि फुलधारणा झाल्यानंतर 40 ते 50 किलो युरियाचा वापर केला पाहिजे.
म्हणजेच सोयाबीन पिकात तीनदा युरिया चा वापर झाला पाहिजे. मात्र अधिक प्रमाणात युरिया चा वापर करू नये असे देखील कृषी तज्ञांनी म्हटले आहे.