Soybean Farming : तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन लागवडीच्या तयारीत आहात का? अहो मग सोयाबीन पेरणीपूर्वी आजची बातमी पूर्ण वाचा. सोयाबीन लागवडी बाबत बोलायचं झालं तर या पिकाची राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. शिवाय पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील सोयाबीन लागवड केली जात आहे.
देशातील एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 40% सोयाबीन उत्पादन एकट्या आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते. उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र मध्य प्रदेश नंतर दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात जवळपास 85 टक्के सोयाबीन उत्पादन होते.
म्हणजे या पिकावर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण अवलंबून आहे. दरम्यान यंदा आपल्या महाराष्ट्रात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड होणार आहे. गेल्या वर्षी कमी पाऊस असतानाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक पेरणी केली होती.
यंदा तर चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढणार आहे. दरम्यान, आज आपण सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी पिकामध्ये कोणत्या खताचा वापर केला पाहिजे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सोयाबीन पिकात कोणते खत वापरावे ?
सोयाबीला पेरणीच्या वेळीचं खत दिले पाहिजे. या पिकाला नायट्रोजन, स्फुरद, पालाश आणि सल्फर या पोषक घटकांची आवश्यकता असते. याशिवाय या पिकाच्या जोमदार वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्य देखील आवश्यक असतात. या सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता फवारणी द्वारे केली जाऊ शकते. तर पोषक घटकांची पूर्तता खतांद्वारे केली जाते. सोयाबीन पिकासाठी फॉस्फरस आणि पालाश या पोषक घटकांची जास्त गरज असते.
नत्राची मध्यम प्रमाणात आणि सुरुवातीच्या काळात गरज असते. सल्फरची कमी प्रमाणात आवश्यकता भासते मात्र पीक वाढीसाठी सल्फर हा घटक महत्त्वाचा आहे. म्हणजे सल्फरची गरज कमी असली तरी देखील सल्फर दिले नाही तर पीक वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. सोयाबीन हे कमी कालावधीचे पीक आहे यामुळे पेरणीच्या वेळी खते द्यावी.
दरम्यान आता आपण सोयाबीन पेरणी करताना कोणती खते दिली पाहिजेत हे थोडक्यात समजून घेणार आहोत. सोयाबीन पीक पेरणीपूर्वी आणि जमीन तयार करण्यापूर्वी शेतात शेणखत पसरून घ्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरल्यास पिकाची वाढ चांगली होते. त्यानंतर खाली सांगितलेल्या कोणत्याही एका खताच्या कॉम्बिनेशनचा पेरणीच्या वेळी वापर केला पाहिजे.
1)12-32-16 हे खत 75-100 किलो + सल्फर 10 किलो किंवा
2)10-26-26 हे खत 75-100 किलो + सल्फर 10 किलो किंवा
3)14-35-14 हे खत 50-100 किलो + सल्फर 10 किलो किंवा
4)सिंगल सुपर फॉस्फेट 150 – 200 किलो (सल्फरची गरज नाही) किंवा
5)20-20-0-13 हे खत 75-100 किलो + पोटॅश 30 किलो
वर सांगितलेले खताचे प्रमाण हे एका एकरासाठी आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी या गोष्टीची काळजी घ्यावी.