Soybean Farming : जर तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन लागवडीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. खरेतर यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.
यंदा आपल्या महाराष्ट्रात देखील सरासरी पेक्षा जास्त पाऊस होणार असा अंदाज आहे. हवामान तज्ञांनी यंदा मानसून वेळेआधीच दाखल होऊ शकतो असे म्हटले आहे.
यामुळे यावर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र काहीसे वाढणार असा विश्वास आहे. जर सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातींची लागवड करणे आवश्यक राहणार आहे.
दरम्यान आज आपण सोयाबीनच्या अशा एका सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत ज्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना हेक्टरी 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकणार आहे.
सोयाबीन हे राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही भागात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या पिकाला नगदी पिकाचा अर्थातच कॅश क्रॉपचा दर्जा मिळालेला आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून हे पीक शेतकऱ्यांना परवडत नाहीये.
याचे कारण म्हणजे सोयाबीनला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाहीये आणि दुसरे म्हणजे सोयाबीन पिकातून पाहिजे तेवढे असे उत्पादन मिळत नाहीये. हेच कारण आहे की आज आपण सोयाबीनच्या विक्रमी उत्पादन देणाऱ्या जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एन.आर.सी. ३७ (अहिल्या -४) जातींचे सोयाबीन ठरणार फायदेशीर
भारतात सोयाबीनच्या विविध जातींची शेती केली जाते. आपल्या राज्यातही शेतकरी बांधव वेगवेगळ्या जातींची लागवड करतात. दरम्यान आज आपण 2017 मध्ये प्रसारित करण्यात आलेल्या एका जातीची माहिती पाहणार आहोत.
आज आपण एन.आर.सी. ३७ (अहिल्या -४) या जाती विषयी जाणून घेणार आहोत. कृषी तज्ञांनी दिलेली माहितीनुसार सोयाबीनची ही जात २०१७ मध्ये भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदोर येथून प्रसारित झाली आहे.
तेव्हापासून ही जात सोयाबीन उत्पादकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. कारण की या जातीपासून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळत आहे. कृषी संशोधकांनी या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते असा दावा केला आहे.
विशेष म्हणजे ही जात आपल्या महाराष्ट्रात लागवडीसाठी अनुकूल आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांत या जातीची शिफारस करण्यात आली आहे. या जातीचे पीक ९६ ते १०२ दिवसांत परिपक्व होत असल्याची माहिती कृषी संशोधकांनी दिली आहे.