Soybean Farming : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या तेलबीया पिकाची राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये लागवड होते. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र विभागात याची लागवड पाहायला मिळते. सोयाबीन उत्पादनाचा विचार केला असता महाराष्ट्र राज्याचा देशात दुसरा क्रमांक लागतो.
पहिल्या क्रमांकावर मध्य प्रदेश हे राज्य विराजमान आहे. देशाच्या एकूण उत्पादनापैकी 45% सोयाबीन उत्पादन मध्यप्रदेश मध्ये घेतले जाते आणि 40 टक्के उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते.
यावरून राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकावर अवलंबून असल्याचे आपल्या लक्षात येते. गेल्या वर्षी सोयाबीनला कमी भाव मिळाला होता. यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
मात्र असे असले तरी यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळेल या आशेने राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी यंदाही मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. दरम्यान, जर तुम्हीही यावर्षी सोयाबीन लागवड केली असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे.
कारण की, आज आपण सोयाबीन पीक पिवळे पडले तर कोणत्या औषधांची फवारणी केली पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
सोयाबीन पीक पिवळे का पडते?
जर तुमच्या शेतात सातत्याने पाणी साचून राहत असेल तर सोयाबीन पीक पिवळे पडण्याची शक्यता अधिक असते. तुम्ही जर सोयाबीन पिकात तणनाशकाची फवारणी केली असेल तर याचे देखील साईड इफेक्ट पिकावर पाहायला मिळतात. तणनाशकाचे प्रमाण जर जास्त झाले तर सोयाबीन पीक पिवळे पडते.
जमिनीत लोह, पालाश, नत्र अशा अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे देखील सोयाबीन पीक पिवळे पडते. अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीन पिवळे पडते मात्र पानाची शिरा हिरवीच राहते. जर तुम्ही सोयाबीन पेरणी केलेली जमीन चुनखडीयुक्त असेल आणि पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होत नसेल तर सोयाबीन पिवळे पडू शकते.
सोयाबीन पीक पिवळे पडल्यास काय करणार ?
तुमच्या शेतात जर पाणी साचलेले असेल तर ते पाणी शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करा. पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होईल याची काळजी तुम्हाला घेणे आवश्यक आहे.
झिंक सल्फेट + फेरस सल्फेट ची फवारणी करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. जर पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव असेल तर फवारणीमध्ये इमामेक्टिन ऍड करावे. याचे प्रमाण दहा ग्रॅम प्रति पंप एवढे असणे आवश्यक आहे.
19-19-19 + मायक्रोन्यूट्रिऐन्ट ची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खोडकीडीचा प्रादुर्भाव असेल तर या फवारणीत इमामेक्टिन 10gm घ्यावे.